नवी दिल्ली : 18 नोव्हेंबर 1978 रोजी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई (Morarji Desai) यांनी कर्नाटकातील चिकमंगळूरमधून पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या विरोधात विशेषाधिकार प्रस्ताव आणला. या प्रस्तावावर 7 दिवस चाललेल्या चर्चेनंतर इंदिरा गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.
बरोबर 45 वर्षांनंतर सुरत न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे सदस्यत्व रद्द (Disqualified) केले आहे. लोकसभेचे मुख्य सचिव उत्पल कुमार सिंह यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की लोकप्रतिनिधी कायदा-1951 च्या कलम 102 (1) (ई) नुसार सदस्यत्व रद्द केले जात आहे.
राहुल गांधींना गुरुवारी सुरत कोर्टाने मानहानीच्या प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेसवाले रस्त्यावर उतरले असून डरो मत अशा घोषणा देत आहेत.
राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय द्वेष भावनेतून, प्रकाश आंबेडकरांची टीका
इंदिरा गांधींनी जोरदार पुनरागमन केले
आणीबाणी संपल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी काँग्रेसविरोधात मोर्चेबांधणी केली. जयप्रकाश नारायण मोर्चाचे नेतृत्व करत होते. 1977 च्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधींचा पराभव झाला. संपूर्ण देशात काँग्रेसच्या 154 जागा कमी झाल्या. यूपी, बिहार, बंगाल आणि मध्यप्रदेशात पक्षाचा धुव्वा उडाला.
इंदिरा गांधी स्वतः रायबरेली मतदारसंघातून निवडणूक हरल्या. त्यांच्या अनेक मंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसच्या पराभवानंतर मोरारजींचे सरकार स्थापन झाले आणि त्यानंतर गांधी कुटुंबावर कारवाईचा टप्पा सुरू झाला. 1978 मध्ये प्रथम संजय गांधींना अटक करण्यात आली आणि नंतर इंदिरा गांधींना पोलिसांनी पकडले. दरम्यान, कर्नाटकातील चिकमंगळूर जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. इंदिरा गांधी यांनी येथून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
खासदारकी जाताच राहुल गांधींचा ‘खतम, गया’ चा Video व्हायरल
इंदिरा गांधींच्या विरोधात ज्येष्ठ समाजवादी नेते वीरेंद्र पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत इंदिराजींनी पाटील यांचा 70 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आणि संसदेत पोहोचण्यात यश मिळविले. मात्र, काही महिन्यांनी इंदिराजींचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.
यानंतर इंदिरा गांधींनी संपूर्ण देशाचा दौरा सुरू केला. बिहारपासून गुजरातपर्यंत आणि दक्षिणेत इंदिराजींच्या जाहीर सभेने काँग्रेसमध्ये प्राण फुंकले. 1980 मध्ये अंतर्गत मतभेदानंतर जनता पक्षाचे सरकार पडले आणि त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या.
जगजीवन राम आणि चौधरी चरणसिंग यांसारख्या दिग्गज नेत्यांचे आव्हान इंदिरा गांधींनी पेलले, इंदिरा गांधींच्या राजकीय संघर्षाने काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणले. 1980 मध्ये काँग्रेसने 529 पैकी 363 जागांवर मोठा विजय मिळवला होता. चौधरी चरणसिंग यांच्या पक्षाने 41 तर जनता पक्षाने 31 जागा जिंकल्या.
कर्नाटकातील कोलार येथे 2019 च्या रॅलीत राहुल गांधींनी चोर आणि मोदींबद्दल भाष्य केले होते. त्यानंतर सुरत न्यायालयात 4 वर्षे सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी आता आजीप्रमाणे काँग्रेसला वैभव मिळवू शकतील का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.