Manipur News : मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू ठेवण्यावर (Manipur News) एकमत झाले आहे. गुरुवारी मध्यरात्री या मुद्द्यावर लोकसभेत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर या हिंसाचारग्रस्त राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने देखील पाठिंबा दिला. मणिपुरच्या मुद्द्यावर ठाकरे गटाकडून केंद्र सरकार आणि भाजपवर सातत्याने टीका केली जात होती. येथील परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू ठेवण्याचा प्रस्ताव काल लोकसभेत ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला ठाकरे गटाने पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
खरंतर या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय 13 फेब्रुवारीलाच घेण्यात आला होता. यानंतर उच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार दोन महिन्यांच्या आत राष्ट्रपती राजवटीची खात्री करण्यासाठी एक संवैधानिक संकल्प काल (बुधवार) गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत मांडला. शाह म्हणाले, मणिपुरच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर राज्यपालांनी आमदारांशी चर्चा केली. त्यावेळी आमदारांनी सांगितले होते की आता आम्ही सरकार बनवण्याच्या स्थितीत नाही. यानंतर कॅबिनेटने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. ही शिफारस राष्ट्रपतींनीही मान्य केली होती.
Speaking in the Lok Sabha on the resolution to approve the Proclamation issued under Article 356 regarding the President’s Rule in Manipur. https://t.co/ihgiuFlFqh
— Amit Shah (@AmitShah) April 2, 2025
उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुरूप आम्ही दोन महिन्यांच्या आत या संदर्भात सभागृहाच्या मंजुरीसाठी एक ठराव आणला आहे. सरकारची पहिली प्राथमिकता राज्यात शांतता आणणे हीच आहे. मागील चार महिन्यांत राज्यात एकही मृत्यू झालेला नाही. फक्त दोन लोक जखमी झाले आहेत. सरकारला राज्यात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करायची आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी देखील या बाबतीत कोणतेही राजकारण करू नये अशी अपेक्षा गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली.
मागील चार महिन्यांत मणिपूरमध्ये कोणताही हिंसाचार झालेला नाही. आता येथील परिस्थिती समाधानकारक आहे असे मी म्हणणार नाही. पण नियंत्रणात नक्कीच आहे. अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी काँग्रेसकडे पु्रेसे खासदार नाहीत असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लगावला. राज्यात मागील दोन महिन्यांपासून राष्ट्रपती राजवट आहे. ही राजवट आणखी काही दिवस हटणार नाही अशी चिन्हे दिसत आहेत.