‘M Factor’ is becoming the real kingmaker of the results : पाच राज्यांतील निवडणुकांसोबतच आज पश्चिम बंगालमध्ये देखील 293 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. सुरूवातीपासूनच समोर येणारे कल इतके चढ उतार दाखवत आहेत की, संपूर्ण चित्र एखाद्या थरारक चित्रपटाच्या क्लायमॅक्ससारखे वाटत आहे. कधी भाजपची भगवा लाट आघाडी घेताना दिसते, तर कधी ममता बॅनर्जी यांचा खेळा पुन्हा त्यांना शर्यतीत पुढे आणताना दिसतो.
ताज्या कलांनुसार भाजपने बहुमताचा आकडा पार केल्याचे दिसत आहे. हे कल अंतिम निकालात रूपांतरित झाले, तर भाजपसाठी हा ऐतिहासिक विजय ठरेल. त्याचबरोबर बंगालमध्ये सत्तांतर होण्याचा अंदाज वर्तवणाऱ्या एक्झिट पोल्सना देखील दुजोरा मिळेल. या निवडणुकीची खरी कथा केवळ जागांच्या आकड्यांपुरती मर्यादित नाही, तर एम फॅक्टर भोवती देखील फिरताना दिसते. यंदा बंगालचे राजकारण हे केवळ ध्रुवीकरण किंवा विकासाच्या मुद्द्यांवर मर्यादित न राहता अनेक सामाजिक आणि राजकीय घटकांनी मिळून घडवली आहे. कोणते आहेत ये सात एम घटक पाहुयात, जे बंगालचे भवितव्य ठरवण्यात निर्णायक ठरत आहेत.
सर्वप्रथम मुस्लिम फॅक्टर, पश्चिम बंगालमधील सुमारे 30 टक्के मुस्लिम मतदार अनेक मतदारसंघांमध्ये निर्णायक भूमिका बजावतात. पारंपारिकरित्या हा मतदारवर्ग तृणमूल काँग्रेसकडे झुकलेला मानला जातो. मात्र, यंदा आम जनता उन्नयन पार्टी स्थापन करणाऱ्या हुमायूं कबीर यांनी या मतांमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यातच भाजपच्य आक्रमक प्रचारामुळे या मतदारसंघात नवे समीकरण तयार झाले.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे, महिला मतदार, ममता बॅनर्जी यांच्या लक्ष्मी भंडारसारख्या योजनांनी महिलांना मोठ्या प्रमाणात आकर्षित केले. दुसरीकडे, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या योजनांमुळे आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यांमुळे भाजप देखील या वर्गात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करताना दिसला. संदेशखाली आणि आर. जी. करसारख्या घटनांवरून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ठळक करण्यात आला. त्यामुळे यंदा महिला मतदार किंगमेकर ठरू शकतात.
तमिळनाडूमध्ये फिल्मी चमत्कार! अभिनेता विजयच्या TVK ने मारली बाजी… DMK ला धक्का
तिसरा आणि महत्वाचा फॅक्टर म्हणजे मायग्रंट, बंगालमधून बाहेर कामासाठी गेलेले लाखो कामगार आणि त्यांचे कुटुंबीय या निवडणुकीत महत्वाचे ठरले. देशातील शहरांतून मोठ्या संख्येने मायग्रंट बंगाली मतदार मतदानासाठी परातल्याच चित्र दिसलं, रोजगाराच्या अभावामुळे स्थलांतर करणाऱ्या या वर्गाच्या भावना आणि अपेक्षा मतदानात स्पष्टपणे उमटल्या. भाजपने सोनार बांग्लाचे स्वप्न दाखवलं, तर तृणमूल काँग्रेसने केंद्राच्या धोरणांवर टीका केली.
चौथा फॅक्टर मतुआ फॅक्टर, उत्तर 24 परगणा आणि आसपासच्या भागांत मतुआ समाजाचे मत निर्णायक आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा या समाजासाठी महत्वाचा मुद्दा राहिला आहे. हा मतदारवर्ग पारंपारिकरित्या भाजपच्या बाजूने झुकलेला मानला जातो. मात्र यंदा तृणमूल काँग्रेसने स्थानिक मुद्द्यांवर भर देत संतुलन साधण्याचा प्रयत्न केला.
पाचवा मशिनरी फॅक्टर, याचा अर्थ फक्त साधनसामग्री नाही, तर संघटनात्मक ताकद, बूथ व्यवस्थापन आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे जाळे असा होतो. भाजपने गेल्या काही वर्षांत बंगालमध्ये आपले संघटन बळकट केले आहे. तर तृणमूल काँग्रेसची जमिनीवरील पकड आधीपासूनच मजबूत आहे. यंदा या दोघांतील स्पर्धेमुळे निवडणूक शिक चुरशीची झाली. तसेच निवडणूक आयोगाने कडक सुरक्षा व्यवस्था आणि स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन प्रक्रियेच्या माध्यमातून मतदार याद्यांमध्ये सुधारणा केल्याने निवडणुकीच्या गणितावर परिणाम झाला.
सहावा म्हणजे ममता फॅक्टर, ममता बॅनर्जी यांची वैयक्तिक प्रतिमा आणि त्यांची लढाऊ राजकारणाची शैली तृणमूल काँग्रेसची सर्वात मोठी ताकद ठरली. त्यांच्या समर्थकांसाठी ही निवडणूक दीदी विरुद्ध इतर अशी बनली, ज्यामुळे भावनिक नाते अधिक मजबूत झाले. विशेष म्हणजे यंदा भाजपने त्यांच्यावर वैयक्तिक टीका टाळण्याची रणनीती अवलंबली.
आणि शेवटचा मात्र तेवढाच महत्वाचा म्हणजे मोदी फॅक्टर, नरेंद्र मोदी यांच्या सभा, रोडशोज आणि केंद्र सरकारच्या योजनांनी भाजपला बंगालमध्ये नवी ऊर्जा दिली. त्यांच्या लोकप्रियतेमुळे नव्या मतदारांना आकर्षित करण्यात मदत झाली. झाड़ग्राममधील रोडशोदरम्यान त्यांनी स्थानिक दुकानात झालमुडी खाल्ल्याचा प्रसंग देखील चर्चेचा विषय ठरला. एकूणच, या सात एम घटकांनी या निवडणुकीचा चेहरामोहरा ठरवला असून, अंतिम निकालातही त्यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येणार आहे.
