तुकाराम मुंडेंनंतर आणखी एक IAS अधिकारी चर्चेत; 15 वर्षांच्या सेवेत तब्बल 11 बदल्या

नेहा यांची नव्या आदेशानुसार मध्य प्रदेश अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळाच्या प्रबंध संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

News Photo   2026 09 07T154018.040

तुकाराम मुंडेंनंतर आणखी एक IAS अधिकारी चर्चेत; 15 वर्षांच्या सेवेत 11 बदल्या

महाराष्ट्रातील बेधडक कारवाईसाठी ओळखले जाणारे IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याप्रमाणेच मध्य प्रदेश कॅडरच्या IAS अधिकारी नेहा मारव्या सिंह यांच्याही सततच्या बदल्यांमुळे चर्चा सुरू झाली आहे. तुकाराम मुंडे यांच्या 21 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत 25 वेळा बदली झाली असून, 25 मे रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या FDA आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांच्या कारवायांची जोरदार चर्चा होत असतानाच नेहा मारव्या सिंह यांच्या बदलीचा मुद्दाही समोर आला आहे.

2011 बॅचच्या मध्य प्रदेश कॅडरच्या IAS अधिकारी असलेल्या नेहा मारव्या सिंह मूळच्या उत्तर प्रदेशातील आहेत. त्यांनी मोतीलाल नेहरू राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, अलाहाबाद येथून संगणक विज्ञान विषयात BTechचं शिक्षण घेतलं. त्यानंतर UPSCची तयारी करत त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. सुमारे 15 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत त्यांची तब्बल 11 वेळा बदली झाली आहे.

FDAला मुंबई हायकोर्टाचा दणका; सिप्लाचा औषध विक्री परवाना रद्द करण्याचा निर्णय मागे

नेहा मारव्या यांना 2025 मध्ये पहिल्यांदा महत्त्वाची फील्ड पोस्टिंग मिळाली आणि त्यांची डिंडोरीच्या कलेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, या पदावर त्यांना वर्षभरही काम करता आलं नाही. अवघ्या 8 महिन्यांतच त्यांची बदली झाली. या काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मतभेद असल्याच्या चर्चांमुळेही त्या चर्चेत आल्या होत्या. आता अवघ्या 50 दिवसांत पुन्हा त्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.

या बदलीवर नेहा मारव्या सिंह यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समोर आलं आहे. आपल्याविरोधात बंडासारखं वातावरण तयार करण्यात आलं आणि त्यानंतर बदली करण्यात आली, असा दावा त्यांनी एका मेसेजमध्ये केला आहे. तसेच या प्रकरणात IAS असोसिएशनने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. नव्या आदेशानुसार त्यांची मध्य प्रदेश अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळाच्या प्रबंध संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सततच्या बदल्यांमुळे पुन्हा एकदा त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीची चर्चा रंगली आहे.

Exit mobile version