Download App

काय सांगता! चक्क मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांत पाणी, भरलं डिझेल मिळालं पाणी; पेट्रोलपंप सील

मुख्यमंत्री यादव एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी निघाले होते. याच दरम्यान त्यांच्या ताफ्यातील 19 वाहने अचानक बंद पडली.

Madhya Pradesh News : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) यांच्या वाहनांच्या ताफ्यात सुरक्षेत मोठा (Madhya Pradesh News) हलगर्जीपणा निदर्शनास आला आहे. मुख्यमंत्री यादव एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी निघाले होते. याच दरम्यान त्यांच्या ताफ्यातील 19 वाहने अचानक बंद पडली. या घटनेची चौकशी केल्यानंतर लक्षात आले की या वाहनांत डिझेलबरोबर पाणीही भरले गेले होते. या घटनेने एकच खळबळ उडाली असून चक्क मुख्यमंत्र्यांच्या बाबतीतच असा प्रकार घडू शकतो याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी प्रशासनाने तत्काळ कारवाई करत संबंधित पेट्रोल पंप सील केला.

याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी रात्री दहा वाजता सीएम मोहन यादव (Mohan Yadav News) यांच्या ताफ्यातील 19 कार डोसीगाव येथील एका पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आल्या होत्या. डिझेल भरल्याच्या काही वेळानंतर या गाड्या अचानक बंद पडल्या. भररस्त्यात गाड्या बंद पडल्या. त्यामुळे त्यांना धक्का देऊन रस्त्याच्या कडेला उभ्या कराव्या लागल्या.

या घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार आशिष उपाध्याय, पुरवठा अधिकारी आनंद गोरे यांच्यासह स्थानिक प्रशासनातील अधिकारी येथे तत्काळ दाखल झाले. ज्या वाहनांत 20 लिटर डिझेल टाकलं होतं यातील दहा लिटर पाणी निघाले. सगळ्याच वाहनांत असेच दिसून आले. एका ट्रकचालकाने तर 200 लिटर डिझेल टाकले होते, काही अंतर गेल्यानंतर त्याचा ट्रक बंद पडला.

Air Force Fighter Plane Crashes : मोठी बातमी! मध्य प्रदेशात हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले

इंदूरवरून मागवली नवी वाहने

घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी पेट्रोलपंपाच्या मॅनेजरला बोलावून घेतलं. पावसामुळे कदाचित इंधनाच्या टाकीत पाणी गेलं असावं अशी शक्यता मॅनेजरने व्यक्त केली. यानंतर पुरवठा विभागाने रात्रीच हा पंप सील केला. याचबरोबर इंदूरवरून पर्यायी वाहनांची व्यवस्था करून रतलाम रवाना करण्यात आल्या. या कामासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली.

इंधनाच्या टाक्यांत पाणी गेल्याची शक्यता

नायब तहसीलदार आशिष उपाध्याय यांनी सांगितले की पावसामुळे इंधनाच्या टाकीत (Fuel Tank) पाणी गेल्याची शक्यता आहे. आता पुरवठा विभागाने हा पेट्रोलपंप (Petrol Pump) सील केला आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात येत आहे. कॉन्क्लेवमध्ये मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्यासह व्हीआयपी मंडळी सहभागी होत आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे.

Video : ट्रक चालकांची ‘औकात’ काढणं अंगलट; CM मोहन यादवांकडून जिल्हाधिकाऱ्यांची हकालपट्टी

follow us