Download App

महाकुंभात चेंगराचेंगरी! अनेक भाविक जखमी, दहा जणांचा मृत्यू; अमृतस्नान रद्द

महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले आहेत. तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

Maha Kumbh Stampede : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ (Maha Kumbh Stampede) पर्व सुरू आहे. या महाकुंभातून धक्कादायक बातमी आली आहे. महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले आहेत. तर दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आखाडा परिषदेने मौनी अमावस्येनिमित्त होणारे अमृतस्नान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची (Prayagraj) माहिती परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी दिली. या निर्णयानंतर आज कोणत्याही आखाड्याकडून अमृतस्नान होणार नाही. दरम्यान, आता येथील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे आधी जे बॅरिकेट्स लावले होते ते आता काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे भाविकांच्या येण्याजाण्याच्या अडचणी कमी झाल्या आहेत.

आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, जी घटना घडली त्यामुळे आम्ही अतिशय दुःखी झालो आहोत. आमच्या बरोबर हजारो भाविक आहेत. त्यामुळे जनहिताचा विचार करून निर्णय घेण्यात आला आहे की आज आखाडे अमृत स्नानात सहभागी होणार नाहीत. आजच्या ऐवजी वसंत पंचमीच्या दिवशी स्नानासाठी यावे असे आवाहन आम्ही भाविकांना केले आहे.

महाकुंभात ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, बनली किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर

भाविक संगमावर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु, भाविकांनी त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी येण्याऐवजी त्यांना गंगा नदी दिसेल त्या ठिकाणी त्यांनी स्नान करावे. प्रशासनाची यात चूक नाही. कोट्यावधी लोकांना सांभाळणे खूप कठीण गोष्ट आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सहकार्य केले पाहिजे असे रवींद्र पुरी म्हणाले.

चेंगराचेंगरीची घटना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. मौनी अमावस्येनिमित्त शाही स्नान होते. त्यामुळे स्नानास जाण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. ज्या ठिकाणी लोक झोपले होते त्याच्या मागील बाजूने लोक आले त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. त्याच वेळी कोट्यावधी लोक संगमाच्या तटावर स्नान करत होते. घटनेची माहिती मिळताच प्रशासन अलर्ट झाले. रुग्णवाहिका दाखल झाल्या त्यांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं..

पोलीस लोकांना घाटावरून बाजूला करत होते. त्यावेळी लोकांना पळण्यास सुरुवात केली यामुळे स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत 50 ते 80 लोक जखमी झाले आहेत. प्रशासनाने अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. आता येथील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे.

या घटनेवर जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांनी प्रतिक्रिया दिली. प्रयागराजमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळे संगम तटावरच स्नान करण्याचा आग्रह कुणीही धरू नये. सध्याची परिस्थिती पाहता भाविकांनी शिबीर सोडून कुठेही जाऊ नये. या घटनेनंतर आखाडा परिषदेने अमृतस्नान रद्द केले आहे. जूना आखाडा, आवाहन आखाडा आणि अग्नि आखाडा यांनी स्नान स्थगित केले आहे. परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल असे यावेळी सांगण्यात आले.

follow us