Download App

Mahadev Betting App : मोठी बातमी! ‘महादेव अ‍ॅप’च्या मालकाला दुबईत अटक; भारतात आणणार

Mahadev Betting App : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या महादेव बुक ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपप्रकरणात  (Mahadev Betting App) महत्वाची बातमी समोर आली आहे. या महादेव बुकचा मालक रवी उप्पल (Ravi Uppal) याला दुबईत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. उप्पल विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. या नोटीसच्या आधारे दुबई पोलिसांनी त्याला अटक केली. आता रवी उप्पलला भारतात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले असून त्याला लवकरच भारताच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

महादेव बुक अ‍ॅप हा सट्टेबाजीचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. या अ‍ॅपवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अन्य देशांत हे अ‍ॅप सुरू आहे. छत्तीसगडचा सौरव चंद्राकर आणि त्याचा सहकारी रवी उप्पल दुबईतून हे अ‍ॅप चालवत होते. सौरव आणि रवी उप्पल या दोघांकडेही सहा हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम असण्याची शक्यता आहे. हवालामार्फत हे पैसे पाठवण्यात आले आहेत. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे. (Mahadev Betting App Owner Ravi Uppal Arrested in Dubai)

Mahadev App Case प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन; आता मुंबईतील प्रोडक्शन हाऊसवर ईडीची धाड!

ईडीच्या आदेशानुसार इंटरपोलने रवी उप्पलविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. या नोटीसच्या आधारे दुबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. रवी उप्पलविरुद्ध बेकायदेशीर सट्टेबाजीसंबंधित मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी उप्पल आणि त्याचा साथीदार सौरव चंद्राकर यांच्या विरुद्ध मनी लाँड्रिंगचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, या प्रकरणात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावरही आरोप झाले होते.  छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या काळातच हे प्रकरण समोर आले होते. त्यामुळे विरोधकांनी बघेल यांना चांगलेच घेरले होते. निवडणूक प्रचारावेळी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या प्रकरणाचा उल्लेख करत काँग्रेसवर निशाणा साधला होता. यानंतर स्वतः बघेल यांनी निवडणूक निकालाच्या एक दिवस आधी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहित अशा प्रकारच्या ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी केली होती.

ज्यूस सेंटर चालवणारा बनला अट्टल सट्टेबाज 

सौरव चंद्राकर हा छत्तीसगडची राजधानी रायपूर शहरात एक ज्यूस सेंटर चालवत होता. नंतर तो सट्टेबाजी करू लागला. सौरव आणि रवी या दोघांकडेही सहा हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या अॅपसाठी दाऊद गँगने दोघांना मदत केल्याचेही समोर आले आहे. ईडीच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. महादेव ऑनलाइन बुक पोकर, कार्ड गेम, चान्स गेम, क्रिकेट, टेनिस, फुटबॉल यांच्या लाइव्ह खेळांत सट्टेबाजी करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत होते. आता या प्रकरणात रवी उप्पलला दुबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याला भारतात आणण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा दुबई पोलिसांच्या संपर्कात आहेत.

Tags

follow us