Download App

उद्योगविश्वाचा ध्रुवतारा निखळला! ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

Ratan Tata Passed Away : प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांचे आज निधन झाले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी रतन टाटा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  रतन टाटा यांनी मार्च 1991 ते डिसेंबर 2012 पर्यंत टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून टाटा ग्रुपचे नेतृत्व केले. परदेशात शिक्षण पूर्ण केल्यानंतर रतन टाटा प्रथम टाटा ग्रुपची कंपनी टाटा इंडस्ट्रीजमध्ये सहाय्यक म्हणून रुजू झाले.

त्यानंतर जमशेदपूर येथील टाटाच्या प्लांटमध्ये काही महिने प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रतन टाटा यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या हाताळण्यास सुरुवात केली. 2008 मध्ये, रतन टाटा यांना भारत सरकारने देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. टाटांच्या दूरदृष्टी आणि धोरणात्मक विचारातून ग्रुपने दूरसंचार, रिटेल आणि ऑटो यासारख्या नवीन क्षेत्रांमध्ये प्रवेश केला. 2008 मध्ये जग्वार लँड रोव्हरची खरेदी ही टाटाच्या सर्वात मोठ्या कामगिरींपैकी एक होती, जो टाटा ग्रुपच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण क्षण होता.

रतन टाटा यांच्यावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ शाहरुख असपी गोळवाला यांच्या निरीक्षणाखाली उपचार करण्यात आले. ब्रीच कॅन्डी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील चौथा मजला हा रतन टाटा यांच्यासाठी राखीव होता. उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यानं रतन टाटा यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.

28 डिसेंबर 1937 साली जन्म झालेले रतन टाटा,अविवाहित होते. रतन टाटा यांचे 3800 कोटींचे व्यावसायिक साम्राज्य आहे. आपल्या संपत्तीतील 65 टक्के संपत्ती रतन टाटा यांनी समाजकार्यासाठी दान दिली. या दशकातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून रतन टाटा यांचा आदराने उल्लेख केला जातो. रतन टाटा यांनी 1961 साली टाटा समूहात काम सुरू केलं. टाटा स्टील या कंपनीत शॉप फ्लोअर वर त्यांनी प्रथम काम केलं.

वारसदार म्हणून चार नावं चर्चेत

रतन टाटा यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि त्यांचे चुलतभाऊ नोएल टाटा टाटा ग्रुपमधील अनेक कंपन्यांतील एक महत्वाचे नाव असलेल्या 34 वर्षीय माया टाटा, स्टार बाजारचे प्रमुख 32 वर्षीय नेविल टाटा आणि इंडीयन हॉटेलचे प्रमुख 39 वर्षीय लीह टाटा या चौघांची नावे रतन टाटा यांचे वारसदार म्हणून सध्या चर्चेत आहेत.

रतन टाटांबाबत काही विशेष

देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार प्रदान करून रतन टाटा यांचा गौरव करावा या मागणीने मोठा जोर धरला होता. हायकोर्टात या मागणीसाठी चक्क याचिकाही दाखल झाली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेण्यास विनम्र नकार दिला होता. तरीही ही मोहीम जोरात सुरू होती. मात्र स्वतः रतन टाटा यांनी पुढाकार घेऊन हे सर्व थांबवा, अशी जाहीर विनंती केली होती. 2008 मध्ये रतन टाटा यांना आपल्या देशातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्वविभूषण प्रदान करून गौरविण्यात आलं होतं. ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया, ऑर्डर ऑफ ब्रिटिश या आंतरराष्ट्रीय सन्मानांनीही रतन टाटा यांचा गौरव करण्यात आला होता.

टाटांनी गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवला

जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तीमत्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!

शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

 

follow us