Mamata Banerjee : पश्चिम बंगालमधील कोलकत्ता इथल्या आरजी मेडिकल कॉलेजमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन हत्या (Kolkatta Rape & Murder Case) केल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरुन गेला आहे. या प्रकारानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मी राजीनामा देण्यास तयार असल्याचं मोठं विधान केलंय. या घटनेप्रकरणी ममता बॅनर्जी आंदोलक डॉक्टरांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या, मात्र कोणीही डॉक्टर चर्चेसाठी भेटायला आलं नसल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता ममता बॅनर्जी यांनी थेट मला खुर्ची नको, मी राजीनामा देण्यास तयार असल्याचं विधान केलंय. यासंदर्भातील व्हिडिओ त्यांनी शेअर केलायं.
मी लोकांच्या हितासाठी राजीनामा देण्यास तयार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं आहे. अत्याचार आणि हत्येच्या घटनेप्रकरणी कोलकत्यामध्ये डॉक्टरांकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलकांची भेट घेण्यासाठी ममता बॅनर्जी गेल्या होत्या. मात्र, ममता बॅनर्जी यांना कोणीही भेटायला आलं नाही. ममता बॅनर्जी पीडित कुटुंब, नातेवाईक आंदोलक डॉक्टरांची वाट पाहत होते, मात्र, त्यांच्यासमोर फक्त रिकाम्या खुर्च्याच होत्या. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर ममता बॅनर्जी तिथून निघून गेल्या.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
ज्यूनिअर डॉक्टरांसोबत मी चर्चा करण्याचा पूर्ण प्रयत्न केलाआहे. मी आंदोलक डॉक्टरांची तीन दिवस वाट पाहिली आहे. त्यांनी माझी भेट घेऊन त्यांच्या समस्या सांगाव्यात. आंदोलक डॉक्टरांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नाकारला असून मला या सर्व गोष्टींच खूप वाईट वाटत आहे. राज्यातील लोकांची मी माफी मागत असून ज्यांना वाटतंय त्यांनी आंदोलनाचं समर्थन करावं, माझी काहीच हरकत नाही. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा असं मला वाटतं, न्यायालयाच्या आदेशानंतर डॉक्टरांनी आता कर्तव्यावर परत जावं, असं बॅनर्जी म्हणाल्या आहेत.
मित्रपक्षांकडूनच अजितदादांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न; वडेट्टीवारांचा मोठा दावा
दरम्यान, कोलकत्त्यामध्ये या घटनेनंतर सर्वच डॉक्टरांनी आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला असून डॉक्टरांकडून कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. जोवर आमच्या मागण्या सरकार मान्य करीत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचा पवित्रा डॉक्टरांकडून घेण्यात आला आहे.