सांगोल्यातील देशमुखांची भाऊबंदकी मिटली, पण फडणवीसांच्या एन्ट्रीने संभ्रम वाढला!
योगेश कुटे :
सांगोल्याचे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांचे दोन नातू डॉ. अनिकेत देशमुख (Aniket Deshmukh) आणि डॉ. बाबासाहेब देशमुख (Babasaheb Deshmukh) यांच्यात आजोबांचा वारसा पुढे कोण चालवणार, हा प्रश्न राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चिला जात होता. या दोन्ही नातवांमध्ये सुप्त संघर्ष असल्याची चर्चा होती. त्याचा फटका तेथे देशमुख गटालाच बसत होता. सांगोल्याचा आमदार कोणी व्हायचे, असा हा मूळ प्रश्न होता. या संघर्षाची ठिणगी २०१९ मध्येच पडली होती. (The conflict between Aniket Deshmukh and Babasaheb Deshmukh in Sangolya is resolved)
गणपतराव यांनी ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी 2019 चे विधानसभा निवडणुकीला उभे होते. मात्र त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या तिकिटावर उभे असणाऱ्या शहाजीबापू पाटील यांनी त्यांचा अवघ्या 600 मतांनी पराभव केला. या पराभवाला देशमुख कुटुंबातील सुप्त वाद हे देखील एक कारण असल्याचे मानले जात होते. आता मात्र हा वाद मिटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 2024 ची निवडणूक शहाजी पाटलांसाठी पुन्हा आव्हान असणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
काय घडलय नेमकं?
अनिकेत आणि बाबासाहेब यांच्यातील वाद मिटल्याचे चित्र निर्माण व्हायला एक कारण झाले ते म्हणजे गणपतराव देशमुख यांच्या पूर्णाकुती पुतळ्याचे उदघाटनाचे. येत्या ३० जुलै ला गणपतराव देशमुख यांचा दुसरा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने सांगोला तालुक्यात विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. शिवाय सांगोला कॉलेज परिसरात गणपतराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. त्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बाबासाहेब आणि अनिकेत यांनी एकत्रित आमंत्रण दिलंय आणि आम्ही एकच आहोत असा संदेश ही सांगोल्याच्या जनतेला दिला आहे.
शरद पवारांना राष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का! नागालँडमधील सर्व आमदारांचा अजितदादांना पाठिंबा
गणपतराव देशमुख यांना एकूण चार मुले होती. त्यातील दोघांचा मृत्यू झाला. नातू अनिकेत हे चंद्रकांत यांचे तर बाबासाहेब हे पोपटराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत. दोघेही पेशाने डॉक्टर आहे. बाबासाहेब हे बरीच वर्षे कोलकत्ता येथे शिक्षणासाठी होते. ते आता परतले आहेत. त्यांच्या पत्नीही डॉक्टर असून त्या सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहेत. अनिकेत यांनी आपले डॉक्टरकीचे शिक्षण पुण्यात पूर्ण केले असून ते अविवाहित आहेत. बाबासाहेब यांचा सांगोल्याशी संपर्क तुटला म्हणून त्यांच्याऐवजी अनिकेत यांना 2019 मध्ये उमेदवारी मिळाली होती. आता गणपतरावांचे कार्यकर्ते ठरवतील, तो निर्णय आम्ही घेऊ असे सांगत दोघांनीही या विषयावर उघड मत व्यक्त केलेले नाही. पण दोघे एकमेकांवर टीकाही करत नाहीत. त्यांच्या समर्थकांमध्ये मात्र आपापल्या नेत्याबद्दल मोर्चेबांधणी सुरू असते.
‘शुभेच्छा शतकोटी, ‘अजित’ महाराष्ट्रासाठी’ : आणखी एका आमदाराने सोडली शरद पवारांची साथ?
राज्याच्या बदलत्या राजकीय समीकरणांचा सांगोल्यावरही परिणाम झाला आहे. शिवसेना आणि भाजप यांच्या युतीचे शहाजीबापू पाटील हेच उमेदवार असतील, असे गृहित धरण्यात आले आहे. या युतीला आता अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी सामील झाल्याने शहाजीबापूंचा हुरूप वाढला आहे. शहाजीबापूंचे स्पर्धक मानले गेलेले दीपकआबा साळुंके हे अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडे सक्षम चेहरा नाही. तशीच गत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची आहे.
गणपतरावांचे दोन्ही नातू अद्याप शेकापमध्येच आहेत. महाविकास आघाडीत शेकाप सहभागी आहे. त्यामुळेच सांगोल्यातील उमेदवार कोण, त्याचे चिन्ह काय याची सारीच उत्सुकता असणार आहे. सध्या तरी देशमुखांचे पुढील वारसदार एकत्र आल्याने शहाजी पाटलांसाठी ते डोकेदुखी ठरू शकतात. पण देशमुखांच्या नातवांना महाविकास आघाडीत राहायचे असेल तर त्यांना देवेंद्र फडणवीस यांना पुतळ्याच्या अनावरणासाठी का बोलावले, असाही प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळेच सांगोल्यात काहीही घडू शकतं, असचं चित्र निर्माण झालयं. आगामी काळात यातील रंगत आणखी वाढणार, हे निश्चित..