Download App

Manipur Violence : जमाव भडकला, थेट मुख्यमंत्र्यांच्याच घरावर हल्ल्याचा प्रयत्न

Manipur Violence : मागील पाच महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत असलेलं मणिपूर (Manipur Violence) अजूनही शांत झालेलं नाही. राज्यात दिवसेंदिवस चिघळत चाललेली परिस्थिती पाहता राज्य सरकारने संपूर्ण राज्य अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी जाहीर केला. त्यानंतर आता पुन्हा मणिपुरात (Manipur) परिस्थिती पुन्हा एकदा बिघडली आहे. थाबौल जिल्ह्यातील भाजप कार्यालय पेटवल्याची घटना ताजी असतानाच संतप्त जमावाने थेट मुख्यमंत्री बिरेन सिंह (CM Biren Singh) यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा दलांनीही या हिंसक जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. 

मणिपूरसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय; जम्मू-काश्मिरमधून बड्या अधिकाऱ्याची रवानगी

गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्री सिंह यांच्या कुटुंबाच्या रिकाम्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितले की यावेळी सुरक्षा दलांनी जमावाला पांगवले. तर मुख्यमंत्री सिंह यांच्या इंफाळ पूर्वेतील हेनगांग येथील वडिलोपार्जित निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. घरापासून 100 मीटर अंतरावरच पोलिसांनी जमावाला रोखलं, असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

जवळपास 500 ते 600 लोकांचा जमाव याठिकाणी आला होता. येथे आरएएफचे कर्मचारी तैनात होते. जमावाला पांगवण्यासाठी आरएएफ आणि राज्य पोलीस कर्मचाऱ्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. येथील वीज पुरवठाही खंडित करण्यात आला होता. घराजवळील बॅरिकेड्स वाढवण्यात आल्या आहेत, असे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे.

‘या’ कारणामुळे पुन्हा पेटलं मणिपूर

महिलांच्या व्हायरल व्हिडीओनंतर आता दोन मुलांच्या मृतदेहाचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या घटनेने पुन्हा एकदा मणिपुरात संघर्ष पेटल्याचं दिसून येत आहे. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मणिपूरमध्ये येत्या 1 ऑक्टोबरपर्यंत इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे.

Manipur : मणिपुरात पुन्हा जाळपोळ! संतप्त जमावाने भाजप कार्यालयाला लावली आग

सहा महिन्यांसाठी राज्यात ‘अफ्स्पा’ लागू

येथील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यालाच ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार 19 विशिष्ट पोलीस ठाणे क्षेत्र वगळता संपूर्ण राज्य सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (AFSPA) अंतर्गत मणिपूरमधील संपूर्ण परिसर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अशांत क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

Tags

follow us