Download App

राजकारणी आणि साहित्यिक यांची लढाई झालीच पाहिजे; सुप्रिया सुळेंची स्पष्ट भूमिका

सुप्रिया सुळे म्हणाल्या, सशक्त लोकशाहीमध्ये टीका झालीच पाहिजे. ती सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूने व्हायला हवी.

  • Written By: Last Updated:

Marathi Sahitya Sammelan 2025 : राजकारणी आणि साहित्यिक यांची लढाई झालीच पाहिजे. सशक्त लोकशाही मध्ये मनभेद असता कामा नयेत मात्र मतभेद असलेच पाहिजेत. समाजहिताच्या धोरणासाठी विरोधकांनी टीका केलीच पाहिजे. आणि विरोधकांच्या टीकेवर आत्मचिंतन करून राज्यकर्त्यांनी कार्य प्रक्रिया सुधारली पाहिजे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले. दिल्ली येथील तालकटोरा येथे चालू असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Marathi Sahitya Sammelan 2025) छत्रपती संभाजी महाराज विचार पिठावरील खुल्या काव्य संमेलनात साहित्यिकांशी यावेळी त्यांनी संवाद साधला.

यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खुल्या कवी संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ. शरद गोरे, शिवस्फूर्ती प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर मोळक, कवी संमेलन अध्यक्ष युवराज नळे, युवा कवी विक्रम मालन, आप्पासो शिंदे, महिला व बालविकासच्या प्रशासकीय अधिकारी सुवर्णा पवार आदी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, सशक्त लोकशाहीमध्ये टीका झालीच पाहिजे. ती सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूने व्हायला हवी. यामध्ये कविता फार मोठ योगदान देते. कवितेच्या माध्यमातून सरकारला जाग आणता येते. कविता प्रभावी शस्त्र असते. कवीने विद्रोह करावा.

डॉ. शरद गोरे म्हणाले,” या खुल्या साहित्य संमेलनातून कष्टकरी साहित्यिक आपली जगण्याची परिभाषा मांडत आहेत. कष्टकऱ्यांच साहित्य हे खऱ्या अर्थाने व्यवस्थेला जाग करण्याचं काम करते. या खुल्या कवी संमेलनातून कवी आपली व्यथा मांडत आहेत आणि मराठी साहित्यासाठी हे चित्र फारच आश्वासक आहे.

कवी संमेलन अध्यक्ष युवराज नळे म्हणाले, संजय नहार आणि शरद गोरे यांच्या माध्यमातून राज्यातील व राज्याबाहेरील शेकडो कवी व कवयित्रींना आपल्या कविता, गझल सादरीकरण करण्याची संधी मिळाली. सर्वांनीच अत्यंत सुंदर विचार समाजाला दिला. साहित्यिक उपेक्षित राहता कामा नये, याची आपण नोंद घ्यायला हवी.

विक्रम मालन, आप्पासो शिंदे म्हणाले,” युवा कवींनी विद्रोही साहित्य जन्माला घालावे. गोडी गुलाबाची कविता कष्टकरी कवीची ओळख सांगत नाही. समाजातील समस्यांचे निरीक्षण करून व्यवस्था सुधारण्याची कविता लिहावी. कवी हाच जग बदलण्याचा विचार देऊ शकतो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निखिल घाडगे यांनी केले. सूत्रसंचालन अमोल कुंभार यांनी केले. रमेश रेडेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

follow us