Download App

ड्रायव्हर होणार ठंडा-ठंडा कूल-कूल! ट्रक केबिनमध्ये येणार एसी, केंद्र सरकारची घोषणा

Truck Drivers AC Cabin Mandatory: उन्हामुळे त्रस्त होत असलेल्या ट्रकचालकांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलासा दिला आहे. 1 जानेवारी 2025 पासून, N2 आणि N3 श्रेणीतील वाहनांच्या केबिनमध्ये एअर कंडिशन सिस्टम अनिवार्य असणार असल्याची घोषणा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) केली आहे.

जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, 1 जानेवारी 2025 रोजी किंवा त्यानंतर उत्पादित केलेली N2 आणि N3 श्रेणीतील वाहने वातानुकूलित केबिनमध्ये बसविली जातील, तसेच IS14618:2022 नुसार वेळोवेळी वातानुकूलित केबिनची चाचणी केली जाईल.

N2 आणि N3 श्रेणीतील वाहने कोणती आहेत?
N2 श्रेणी: या श्रेणीमध्ये अवजड मालाची वाहने येतात. यांचे एकूण वजन 3.5 टनांपेक्षा जास्त आणि 12 टनांपेक्षा कमी आहे.
N3 श्रेणी: N3 श्रेणीमध्ये एकूण वजन 12 टनांपेक्षा जास्त आहे अशा अवजड मालाची वाहने येतात.

नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 6 जुलै रोजी सांगितले होते की, ट्रकच्या केबिनमध्ये वातानुकूलित यंत्रणा अनिवार्य करण्याच्या मसुद्याच्या अधिसूचनेला मान्यता देण्यात आली आहे.

ट्विटमध्ये म्हटले आहे की, “तयार केलेल्या मसुद्यात N2 आणि N3 श्रेणीतील ट्रकचा समावेश आहे. N2 आणि N3 श्रेणीतील ट्रकच्या केबिनमध्ये एअर कंडिशन सिस्टम अनिवार्य करण्यासाठी मसुदा अधिसूचनेला मान्यता देण्यात आली आहे.” रस्ता सुरक्षा सुनिश्चित करण्यात ट्रक चालकांची महत्त्वाची भूमिका आहे. गडकरी पुढे म्हणाले, ट्रक चालकांना आरामात काम करण्यासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरेल, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढेल आणि थकवा येण्याची समस्याही दूर होईल.

Tags

follow us