Prajwal Revanna Sex Racket : बलात्कार प्रकरणात दोषी ठरून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला माजी खासदार प्रज्वल रेवन्ना पुन्हा अडचणीत आला आहे. बंगळुरू मध्यवर्ती कारागृहातील हाय सिक्युरिटी सेलमध्ये त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोन आणि पेन ड्राइव्हच्या फॉरेन्सिक तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडीओ आढळून आलं असून, तुरुंगातून बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधल्याचे रेकॉर्डिंगही तपासात मिळालं आहे.
फॉरेन्सिक अहवालानुसार, मोबाईल फोनमध्ये 145 पेक्षा अधिक पॉर्न क्लिप सेव्ह असल्याचं आढळलं. याशिवाय ओटीटीवरील मालिका आणि चित्रपटही मोबाईलमध्ये सापडले आहेत. तर पेन ड्राइव्हमध्ये 100 पेक्षा अधिक अश्लील व्हिडीओ असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. फोनच्या कॉल रेकॉर्डचीही तपासणी करण्यात आली असून, मध्यस्थांच्या माध्यमातून रेवन्नाच्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्क झाल्याचं समोर आलं आहे. एका मैत्रिणीलाही थेट फोन केल्याची माहिती तपासात मिळाली आहे.
मोठी बातमी, महिला अत्याचार प्रकरणात माजी खासदार प्रज्वल रेवन्ना दोषी
दरम्यान, 11 ऑगस्ट रोजी पोलिसांनी रेवन्नाच्या बराकीची झडती घेतली होती. यावेळी मोबाईल फोन, सिम कार्ड, चार्जर आणि एक नोटबुक जप्त करण्यात आलं. नोटबुकमध्ये 7 फोन नंबर आढळले असून, त्यात कुटुंबातील सदस्य आणि एका मैत्रिणीच्या नंबरचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. रेवन्नाने जप्त केलेला मोबाईल आपला नसल्याचा दावा केला असून, इतर कैदी त्याचा वापर करत असल्याचं म्हटलं आहे. मात्र, नोटबुक आपलं असल्याचं त्याने मान्य केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या प्रकरणात आता तपास यंत्रणेकडून पुढील कारवाईला वेग येण्याची शक्यता आहे. जप्त केलेल्या फोनवरून संपर्क साधलेल्या व्यक्तींना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात येणार आहे. तसंच रेवन्नापर्यंत मोबाईल आणि इतर साहित्य पोहोचवल्याच्या आरोपावरून 5 जणांना अटक करण्यात आली असून, त्यात कारागृहातील एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. त्यामुळं जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या रेवन्नाच्या कारागृहातील संपर्कांवरही आता तपास यंत्रणांचे लक्ष केंद्रीत झालं आहे.
