Onion Price : देशात वाढणाऱ्या महागाईत कांद्याच्या दरात वाढ झाल्याने अनेकांचे बजेट बिघडले आहे. मात्र पुढील काही दिवसात देशात काद्यांचे भाव कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकार कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी आपल्या बफर स्टॉकमधून विक्री वाढवणार आहे. तसेच नवीन खरीप पिकाची आवक आणि जुन्या साठ्याची उपलब्धता यामुळे बाजारातील कांद्याचा पुरवठा सुधारण्याची अपेक्षा आहे. आज बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत कांद्याचे भाव जवळपास दुप्पट आहेत.
अहवालानुसार, 10 ऑक्टोबर रोजी देशातील कांद्याचा सरासरी किरकोळ दर 52.99 रुपये प्रति किलो होता. गेल्या वर्षी याच काळात हा दर 26.65 रुपये प्रति किलो होता. वार्षिक आधारावर पाहता, सरासरी किरकोळ दरात सुमारे 99 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गेल्या महिन्यात दरात किरकोळ घटतर दुसरीकडे ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 10 सप्टेंबर रोजी कांद्याचा सरासरी किरकोळ दर 53.10 रुपये प्रति किलो होता, जो 10 ऑक्टोबरपर्यंत 52.99 रुपये प्रति किलोवर आला आहे. कांद्याचा सरासरी घाऊक दर 4,591 रुपये प्रति क्विंटल इतका होता. हा दर एका महिन्यापूर्वीच्या तुलनेत 2.4 टक्क्यांनी आणि एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 123.3 टक्क्यांनी अधिक आहे.
महाराष्ट्रातून कांद्याचा वाढलेला पुरवठा
कांद्याच्या दरात (Onion Price) अपेक्षित दिलासा मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र आणि इतर उत्पादक राज्यांमधून नवीन पिकाची वाढलेली आवक. व्यापाऱ्यांच्या मते, नोव्हेंबरपर्यंत बाजारातील कांद्याची उपलब्धता सुधारेल. कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून होणारा पुरवठा नोव्हेंबरच्या अखेरीसपर्यंत सुरू राहण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील लवकर येणाऱ्या (अर्ली) खरीप पिकाची आवक ऑक्टोबरच्या अखेरीस अल्प प्रमाणात सुरू होऊ शकते. त्यानंतर, आवक वाढल्याने बाजारातील उपलब्धता वाढण्याची शक्यता आहे.
जुन्या कांद्याचा पुरेसा साठा
अहवालांनुसार, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात जुन्या कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. यामुळे नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत मागणी पूर्ण करण्यास मदत होऊ शकते. दरम्यान, राजस्थानमधील अलवर भागातून कांद्याचा पुरवठा वाढल्यामुळे उत्तर भारताचे महाराष्ट्रावरील अवलंबित्व कमी होऊ शकते.
सरकारकडून 123 शहरांमध्ये विक्रीचा विस्तार
कांद्याचे वाढते दर नियंत्रित करण्यासाठी, केंद्र सरकारने आपल्या राखीव साठ्यातून (बफर स्टॉक) कांद्याची विक्री 123 शहरांपर्यंत वाढवली आहे. 7 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या सरकारी निवेदनानुसार, खरीप हंगामातील कांद्याचे लागवड क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 5 टक्क्यांनी अधिक असण्याचा अंदाज आहे.
म्हणूनच कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली…, अजित आगरकरांवर सर्वात मोठा आरोप –
सामान्य जनतेला दिलासा कधी?
येत्या काही आठवड्यांत कांद्याच्या दरांचा कल हा प्रामुख्याने नवीन पिकाची आवक, जुन्या साठ्याची उपलब्धता आणि सरकारी विक्रीचा परिणाम यांवर अवलंबून असेल. जर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमधून अपेक्षेप्रमाणे पुरवठा वाढला, तर ऑक्टोबरच्या उत्तरार्धात आणि नोव्हेंबरमध्ये दरांवरील दबाव कमी होऊ शकतो असा दावा करण्यात येत आहे.
