Download App

डॉ. एम. एस. स्वामीनाथन : …अन् IPS झालेला मुलगा शेतकऱ्यांचं आयुष्य बदलण्यासाठी बांधावर रमला

पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा आपला देशात गव्हाचा प्रचंड तुटवडा जाणवत होता. अन्नधान्याच्या क्षेत्रावर आलेलं हे संकट दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील होते. त्यांच्यानंतर पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी यांनी गव्हाच्या संकटावर मात करण्यासाठी अमेरिकेची मदत घेतली. पण आपल्या चलनाचे म्हणजेच रुपयाचे अवमूल्यन होईल अशी अट अमेरिकेने टाकली. या गोष्टी इतिहासात प्रथमच घडत होत्या.  (Dr. M. S. Swaminathan came into agriculture to change the lives of farmers)

अशा परिस्थितीत देशाच्या मदतीला धावले एमएस स्वामीनाथन!

स्वामीनाथन (Dr. M. S. Swaminathan) यांच्याचमुळे आपण अशा वाईट परिस्थितीतून बाहेर येऊ शकलो. स्वामीनाथन यांचे वडील डॉ. एमके सांबशिवन हे सर्जन होते. त्यामुळे आपल्या मुलानेही आपल्यासारखे डॉक्टरच व्हावे अशी त्यांची इच्छा होती. सांबशिवन हे गांधीजींचे अनुयायीही होते. पुढे वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर, स्वामीनाथन यांनी वैद्यकीय शाळेत प्रवेश घेतला, परंतु 1943 च्या बंगालच्या दुष्काळाच्या भीषणतेने त्यांच्या विचार बदलले. देशासाठी काहीतरी करायला हवे, असे त्यांना वाटत होते. त्यांनी प्रथम प्राणीशास्त्राचा अभ्यास केला, त्यानंतर दुष्काळाची भीषणता कायमची संपविण्यासाठी त्यांनी कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला.

भारतीय कृषी संशोधन संस्थेतून पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर, त्यांनी यूपीएससीची तयारी सुरु केली. त्यातून त्यांची आयपीएससाठीही निवड झाली, परंतु त्यांनी आयपीएस ऐवजी, युनेस्कोच्या कृषी संशोधन फेलोशिपची निवड केली. बटाट्याच्या जनुकशास्त्रावर संशोधन करण्यासाठी ते नेदरलँड्समधील इन्स्टिट्यूट ऑफ जेनेटिक्समध्ये गेले. तेथून ते केंब्रिज स्कूल ऑफ अॅग्रिकल्चर विद्यापीठाच्या प्लांट ब्रीडिंग इन्स्टिट्यूटमध्ये गेले. इथेच त्यांनी पीएचडीची पदवी घेतली. विस्कॉन्सिन युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसरपदासाठी संधी असूनही ते भारतात परतले.

शेतकऱ्यांचा आधारवड हरपला; प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचं निधन

कृषी शास्त्रज्ञ डॉ. स्वामीनाथन यांनी ‘हरितक्रांती’ यशस्वी करण्यासाठी दोन केंद्रीय कृषी मंत्री पहिले सी. सुब्रमण्यम (1964-67) आणि दुसरे जगजीवन राम (1967-70 आणि 1974-77) यांच्यासोबत जवळून काम केले. याकाळात रासायनिक-जैविक तंत्रज्ञानाद्वारे गहू आणि तांदळाची उत्पादकता वाढवली गेली. हरित क्रांतीमुळे भारताला धान्य क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या मार्गावर वाटचाल करता आली. शेतकऱ्याचे उत्पादन वाढवण्यासाठी सुरू झालेल्या हरित क्रांतीमुळे भारताचे चित्र बदलले. या हरित क्रांतीमध्ये त्यांचे सर्वात मोठे योगदान होते.

पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात शेतीमध्ये ट्रॅक्टर, कीटकनाशके, खते इत्यादींचा वापर करून गव्हाच्या उच्च उत्पन्न देणाऱ्या वाणांच्या बियाण्यांचा वापर सुरू झाला. याची सुरुवात पंजाबपासून झाली आणि 1970 पर्यंत पंजाबने संपूर्ण देशाच्या 70 टक्के गहू पिकवायला सुरुवात केली. मात्र, नंतर खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचे नुकसान झाल्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली. पण धान्य उत्पादनाच्या बाबतीत तरी भारताने स्वावलंबनाकडे वाटचाल केली. त्यामुळेच आता दुष्काळासारखी परिस्थिती इतिहासजमा झाली आहे.

विश्लेषण : कचऱ्यातून पैसा! भारताच्या इकॉनॉमीला बूस्टर देणारं Waste Economy नेमकं काय?

स्वामीनाथन यांना 1972 मध्ये भारतीय कृषी संशोधन संस्थेचे महासंचालक बनवण्यात आले. या काळात त्यांनी अनेक संशोधन संस्था स्थापन केल्या. 1979 मध्ये कृषी मंत्रालयात प्रधान सचिव म्हणून काम करत असताना त्यांनी जंगलांच्या सर्वेक्षणाचे मोठे काम केले. त्यांना जगातील पहिला ‘वर्ल्ड फूड प्राइज’ देण्यात आला, संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाने त्यांना ‘फादर ऑफ इकॉनॉमिक इकोलॉजी’ म्हणून संबोधले, भारत सरकारने त्यांना भारताचा दुसरा सर्वोत्कृष्ट पुरस्कार पद्मविभूषण देऊन सन्मानित केले आहे.

Tags

follow us