Government Launch MSME Credit Card : तुम्ही छोटे दुकानदार, लघु उद्योजक किंवा एमएसएमई (MSME) धारक आहात का? आणि तुम्हालाही व्यवसायासाठी खेळत्या भांडवलाची चिंताय तर, आता ही चिंता विसरा. कारण, केंद्र सरकार याच महिन्यात छोट्या व्यावसायिकांसाठी एक ‘क्रांतिकारी क्रेडिट कार्ड’ लाँच करण्याच्या तयारीत आहे. या योजनेमुळे आता व्यापाऱ्यांना सावकारांकडे चकरा मारण्याची गरज उरणार नाही. कमी व्याजदर असलेल्या या क्रेडिट कार्डमुळे उद्योजकांना पाच लाख रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे. नेमकं हे कार्ड काय? त्याबद्दल जाणून घेऊया…
काय आहे योजना?
फायनान्शिअल एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ‘उद्यम’ पोर्टलवर नोंदणी केलेल्या उद्योजकांना सरकार 5 लाख रुपयांपर्यंतचे असुरक्षित (Unsecured) क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही.
व्याजाचा दर निम्म्यावर
सध्या बाजारात प्रचलित असलेल्या क्रेडिट कार्ड्सवर बँका किंवा खाजगी संस्था वार्षिक 36 ते 42 टक्के इतका प्रचंड व्याजदर आकारतात. मात्र, सरकारच्या या नवीन योजनेअंतर्गत हा व्याजदर निम्म्यावर, म्हणजेच सुमारे 18 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवला जाण्याची शक्यता आहे.
30 दिवसांचे व्याज माफ
सूत्रांच्या माहितीनुसार, 30 दिवसांचा ‘व्याजमुक्त कालावधी’ आणि लवचिक परतफेडीच्या पर्यायांमुळे उद्योजकांवरील व्याजाचा बोजा मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
– ‘उद्यम’ पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या सूक्ष्म उद्योगांना 5 लाखांपर्यंतचे कर्ज कोणत्याही तारणाशिवाय मिळणार
– जर कार्डची रक्कम वेळेवर भरता आली नाही, तर थकबाकीचे रूपांतर 10 ते 12 टक्के व्याजाच्या सुलभ हप्त्यांमध्ये (EMI) करण्याची सुविधा दिली जाण्याची शक्यता
– जे उद्योजक आधीच 10 ते 15 लाखांचे मुद्रा कर्ज घेत आहेत, त्यांना अल्पमुदतीच्या गरजेसाठी हे अतिरिक्त ५ लाख रुपये वरदान ठरू शकतात
बँकांना मिळणार सरकारचे ‘गॅरंटी’ कवच
कर्ज बुडण्याची भीती (Default Risk) कमी करण्यासाठी या योजनेला CGTMSE किंवा CGFMU सारख्या सरकारी क्रेडिट गॅरंटी फ्रेमवर्कचे संरक्षण दिले जाणार आहे. यामुळे बँका बिनधास्तपणे कमी व्याजदरात कर्ज देऊ शकतील. या एका निर्णयामुळे एमएसएमई क्षेत्रात दरवर्षी 25,000 ते 50,000 कोटी रुपयांचे अतिरिक्त भांडवल खेळते होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
कार्डची गरज का पडली?
मोठ्या कंपन्यांकडून पेमेंट मिळण्यास अनेकदा 90 दिवसांपेक्षा जास्त उशीर होतो. अशा वेळी कच्चा माल खरेदी करणे किंवा कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी छोट्या व्यावसायिकांना प्रचंड अडचण येते. हे ‘क्रेडिट कार्ड’ अशा कठीण काळात व्यापाऱ्यांसाठी मदतीचा हात ठरणार आहे.
पहिल्या टप्पात आणणार 10 लाख कार्ड
पहिल्या टप्प्यात सरकार 10 लाख कार्ड्स बाजारात आणणार असून, बँकांना हे कार्ड वाटप करण्यासाठी प्रति कार्ड 500 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. यासाठी बँकांनी आपली तयारी पूर्ण केली असून, या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान किंवा अर्थमंत्र्यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
