नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक अवघ्या महिन्याभरावर आली असतानाच इंडिया आघाडीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस, संयुक्त जनता दल, आम आदमी पक्ष यांच्यापाठोपाठ जागावाटपाच्या चर्चांचे गुऱ्हाळ संपत नसल्याने नॅशनल कॉन्फरन्सनेही इंडिया आघाडीपासून फारकत घेतली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.
फारुख अब्दुल्ला म्हणाले, मला वाटते विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी होतील. त्यामुळे आता मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की नॅशनल कॉन्फरन्स (National Conference) स्वबळावर निवडणूक लढवेल. यात शंका नाही. मात्र आपण भविष्यात इंडिया आघाडीसोबत जाणारच नाही, असे म्हणत त्यांनी भविष्यात एकत्र येण्याचे आश्वासन दिले आहे. (National Conference chief Farooq Abdullah has announced that he will contest the election on his own.)
याआधीही फारुख अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीतील जागावाटपावर नाराजी व्यक्त केली होती. हे प्रश्न लवकर सुटले नाहीत तर अनेक पक्ष एकमेकांपासून दूर जातील, असे ते म्हणाले होते. आता त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.
फारुख अब्दुल्ला यांच्या घोषणेनंतर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, “वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या मजबुरी असतात. मला विश्वास आहे की नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी हे पक्ष इंडिया आघाडीचा भाग आहेत आणि भविष्यातही तसेच राहील.
जम्मू-काश्मीरमधील भारतीय आघाडीत प्रामुख्याने काँग्रेस, मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि डावे यांचा समावेश आहे. मात्र, या पक्षांमध्ये जागांबाबत चर्चा होऊ शकली नाही. जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेच्या पाच जागा आहेत. त्यापैकी तीन जागा नॅशनल कॉन्फरन्सकडे तर दोन जागा भाजपकडे आहेत.