Narayan Rane vs Ashok Chavan : 16 वर्षे झाली… अशोकाचं ‘झाड’ राणेंचा पिच्छा सोडेना…

Narayan Rane vs Ashok Chavan : 16 वर्षे झाली… अशोकाचं ‘झाड’ राणेंचा पिच्छा सोडेना…

साल 2008. “नारायण राणेंचा पत्ता कट, अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी.”

साल 2015. “माझ्या पराभवाला माझ्याच पक्षातील काही लोक जबाबदार आहेत. त्यांना मी पहिल्या दिवसापासून आवडत नाही.”

साल 2017. “फक्त नारायण राणेला अडचण निर्माण करायीच एवढेच काम अशोक चव्हाण यांना आहे.”

साल 2024. “अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी. नारायण राणेंचा पत्ता कट!”

वर्ष बदलली, पक्ष बदलले पण ना परिस्थिती बदलली ना व्यक्ती. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भाजपमधील एन्ट्रीनंतर नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांच्यातील जुन्या वादाचे संदर्भ पुन्हा ताजे झाले आहेत. त्यातही राणे यांच्याच राज्यसभेच्या जागेवर चव्हाण यांना उमेदवारी दिल्याने “सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली” अशीही काहीशी त्यांची अवस्था झाली असल्याचे बोलले जात आहे. कारण चव्हाण यांच्यावरच खापर फोडतच राणे यांनी काँग्रेसमध्ये दोनवेळा बंड केले होते. त्यातील पहिले बंड दोन महिन्यात शमले.

पण दुसऱ्या बंडात त्यांनी काँग्रेसला राम-राम केला तो केलाच. त्यानंतर ते भाजपमध्ये आले, सेटल झाले, केंद्रीय मंत्री झाले. आता राणे यांनी अशोक चव्हाण यांचे भाजपमध्ये स्वागत केले असले आणि त्यांना मिळालेल्या राज्यसभेच्या उमेदवारीबाबत त्यांचे अभिनंदन केले असले तरीही राणे यांच्या पुनर्नियुक्तीची चर्चा असतानाच एक दिवसांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली गेल्याने ते कुठेतरी नाराज असणार हे नक्की. कारण पुन्हा तेच. पुन्हा जुने संदर्भ अन् पुन्हा अशोक चव्हाण.

पण नारायण राणे आणि अशोक चव्हाण यांच्यातील है हाडवैर नेमके का आणि कधीपासून सुरु झाले? याच सगळ्या गोष्टी जाणून घेऊ.

नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले. त्यावेळी काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी राणे यांना इतर पक्षाकडूनही ऑफर होती. पण त्यांनी काँग्रेसचा मार्ग स्वीकारला. काँग्रेसच्या तत्कालिन अध्यक्षा सोनिया गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणाऱ्या अहमद पटेल यांनी राणेंची भेट घेतली. त्यांना सहा महिन्यात मुख्यमंत्री करु असे आश्वासन दिले आणि राणे काँग्रेसमध्ये दाखल झाले. 2005 ते 2008 या तीन वर्षांच्या काळात राणे यांनी किमान तीनवेळा दिल्लीत काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. या तिन्ही भेटीत त्यांना एक आठवड्यात तुम्ही शपथ घ्याल, असे आश्वासन मिळाले, पण आठवड्याचे महिने झाले आणि वर्ष झाले तरी विलासराव देशमुख काही मुख्यमंत्रीपदावरुन हटत नव्हते.

याकाळात काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री बनण्यासाठी नारायण राणे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पतंगराव कदम असे नेते होते. यात राणे-चव्हाण यांनी एकत्र देत विलासराव देशमुखांविरोधात मोर्चा उघडला. काहीही करुन विलासरावांना हटवायचे यासाठी राणेंनी मोहीम राबविली होती. विलासराव आणि अशोकरावांचे बिनसल्यावरही अशोकरावांनी राणे यांना साथ दिली. पुढे 26-11 च्या दहशतावी हल्ल्यानंतर देशमुख यांनी राजीनामा दिला. राणेंना इथेच संधी दिसली. त्यांनी पुन्हा तयारी सुरु केली.

मेधा कुलकर्णी राज्यसभेवर! ब्राह्मण समाजाची समजूत अन् लोकसभेला ब्राह्मणेतर उमेदवाराची तयारी

दिल्लीवरून तत्कालिन मंत्री प्रणव मुखर्जी, ए.के.अँटनी आणि दिग्विजय सिंह हे तीन नेते निरीक्षक म्हणून आले आणि विधीमंडळात प्रत्येक आमदाराला भेटले. या भेटीवर नारायण राणे म्हणाले होते की, मला त्यावेळी 48 आमदारांनी मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला होता. 32 जणांनी ‘अशोक चव्हाण’ यांना तर चार जणांनी बाळासाहेब थोरात यांच्यामागे ताकद उभी केली. झाले आता त्या दिवशी प्रणव मुखर्जी विधिमंडळाच्या पायरीवरुन मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचे नाव जाहीर करणार होते.

काँग्रेसमध्ये मतदान झाल्यानंतर निरीक्षकाने निवडलेल्या नेत्याचे नाव जाहीर करायची पद्धत आहे. पण त्या दिवशी ते जाहीर झाले नाही. त्याच रात्री प्रणव मुखर्जी, अँटनी, दिग्विजय सिंह दिल्लीला जायला निघाले. सोबत नारायण राणे यांनाही घेतले. दिग्विजय सिंग यांनी तर राणे यांचं अभिनंदन केले. पण सकाळी अकरा वाजता टीव्ही लावला तर त्यात मुख्यमंत्रीपदी अशोक चव्हाण यांचे नाव होते. इथेच राणे आणि अशोक चव्हाण यांच्यात पहिली ठिणगी पडली.

त्यानंतर राणे यांनी अशोक चव्हाणांविरोधात मोर्चा उघडला. ते स्वतःचे मंत्रीपद संभाळू शकत नाहीत.  मुख्यमंत्रीपदासाठी ते माझे प्रतिस्पर्धी कसे असतील?, अशोक चव्हाण  मुख्यमंत्रीपदासाठी पात्र नाहीत, लायक नाहीत, अशी टीका जाहीरपणे करण्यास सुरुवात केली. सोबत अहमद पटेलांवरही राणेंनी जहरी टीका केली. इतकचे नाही तर “मैं यदि चाहूं तो नई सरकार को शपथ लेने से रोक सकता हूं या बनने के बाद इसे गिरा सकता हूँ. नई सरकार के पास बहुमत नहीं है और विपक्ष के विश्वास मत की मांग नहीं करने के बावजूद मैं इस बात को सदन के पटल पर साबित कर सकता हूँ.” अशा जाहीर धमक्या देण्यास त्यांनी सुरुवात केली.

राणेंचे काँग्रेसमधून निलंबन झाले. पण दोन महिन्यातच त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. त्यासाठी स्वतः चव्हाण यांनीच सोनिया गांधी यांची भेट घेऊन शब्द टाकला होता. राणे चव्हाणांच्या मंत्रिमंडळात आले, उद्योगमंत्री झाले. 2009 मध्ये निवडणुका झाल्या, पुन्हा चव्हाणांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. राणे महसूल मंत्री झाले. आदर्श घोटाळ्यात नाव आल्यानंतर अशोक चव्हाण गेले अन् पृथ्वीराज चव्हाण आले. राणेंकडे पुन्हा उद्योगखाते आले. 2014 च्या निवडणुकीत मात्र राणेंचा पराभव झाला. कोकणातच पराभव झाल्याचे राणेंना चांगलेच जिव्हारी लागले होते.

पण त्यांनी हार मानली नाही. 2015 मध्ये वांद्रे पूर्वमध्ये शिवसेना आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली होती. तिथे राणे यांना तिकीट तर मिळाले पण त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर राणे यांनी त्यांच्या प्रहार वृत्तपत्रातून एक अग्रलेख लिहिला. याचे शीर्षक होते, ‘राणे लढले, काँग्रेस हरली’. आपल्या पराभवासाठी काँग्रेस पक्षातीलच अनेक नेत्यांचा हात होता असा सरळ आरोप राणेंनी केला. नारायण राणे निवडून येता कामा नयेत, हे सेना-भाजपाला वाटणे स्वाभाविक आहे. पण, काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांना तीच धास्ती होती, असा दावाही त्यांनी केला. त्यांचा सरळ रोख प्रदेशाध्यक्ष असलेल्या अशोक चव्हाण यांच्यावर होता.

राज ठाकरेंच्या मनात साईनाथ बाबर? लोकसभेत वसंत मोरेंना ‘कात्रजचा घाट?’

2017 मध्ये राणे-चव्हाण वादाने टोक गाठले. अशोक चव्हाण यांनी 2017 मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त केली आणि राणेंचे कट्टर विरोधक मानल्या जाण्याऱ्या आणि चव्हाण यांचे विश्वासू समजल्या जाणाऱ्या विकास सावंत यांच्या हातात पक्षाची धुरा सोपवली. राणेंना हा निर्णय आजिबातच पटला नव्हता. नारायण राणे, निलेश राणे आणि नितेश राणे असेही तिघेही चव्हाणांवर अक्षरशः तुटून पडले.

अशोक चव्हाण यांनी भाजपची सुपारी घेतली आहे, पक्षात पात्र लोकांना काहीच मिळत नाही, अपात्र लोकांना पद दिली जातात, विक्रम सावंत पक्षाचा एकही आमदार निवडून आणू शकत नाही, तो अध्यक्ष कसा असू शकतो? कोणत्या आधारावर त्याची नियुक्ती केली? अशोक चव्हाण आणि काँग्रेसमधील काही नेत्यांना नारायण राणेंचा चेहरा पहिल्यापासूनच आवडत नाही, फक्त नारायण राणेला अडचण निर्माण करायीच एवढेच काम अशोक चव्हाण यांना आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

इथूनच अशोक चव्हाण आणि राणेंमध्ये तिसऱ्यांदा ठिणगी पडली. यानंतरच्या काळात राणे आणि चव्हाण यांच्यात सातत्याने वाद होत राहिले. काही दिवसातच राणेंनी काँग्रेसला राम राम ठोकला. महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. पण अवघ्या वर्षभरात त्यांनी हा पक्ष भाजपमध्ये विलिन केला आणि ते राज्यसभेवर खासदार झाले. तर मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर केंद्रात मंत्री झाले. त्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाले आहेत. शिवाय राणे ज्या जागेवर खासदार होते तेच तिकीट अशोक चव्हाण यांना दिले आहे. आता राणेंनी चव्हाण यांचे स्वागत केले असून राज्यसभेसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. पण या निमित्ताने 18 वर्षांनंतरही राणे आणि चव्हाण यांच्या राजकीय वाटा एकाच ठिकाणी येऊन थांबतात हे सिद्ध झाले हे नक्की.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज