Download App

अर्ज मोदींचा पण, पॉलिटिक्स काका-पुतण्याचं; उमेदवारीच्या गर्दीतला किस्साही खास..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Bihar Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसी मतदारसंघातून (Varanasi Lok Sabha) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्याबरोबर भाजप आणि मित्र पक्षांतील दिग्गज नेते हजर होते. काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हजेरी लावली. पण या सगळ्यात बिहारमधील काका पुतण्याचं पॉलिटिक्स (Bihar Politics) चर्चा करवून गेलं. खरंतर माजी केंद्रीय मंत्री पशुपती पारस सध्या भाजपवर कमालीचे नाराज आहेत. या नाराजीला कारण ठरले आहेत लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान.

काका मोदींच्या डाव्या, पुतण्या उजव्या बाजूला

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उमेदवारी (PM Modi Nomination) अर्ज दाखल करण्यासाठी बिहारमधून लोजपा रामविलास पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान, राष्ट्रीय लोक मोर्चाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा आणि हिंदुस्तानी आवामी मोर्चाचे जीतन राम मांझी उपस्थित होते. मोदी यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते बाहेर निघाले त्यावेळी त्यांच्या उजव्या बाजूला चिराग पासवान तर डाव्या बाजूला अन्य भाजप नेत्यांसोबत पशुपती पारस होते. मोदींच्या उमेदवारी अर्ज भरतेवेळी दोघे नेते हजर होते खरे पण दोघेही दोन टोकाला उभे होते. त्यामुळे बिहारच्या राजकारणात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

राजकारणातील दिग्गज! निवडणुका जिंकण्यातही मास्टर; नेत्यांच्या खासदारकीची स्टोरीही खास…

बिहारमधील जागावाटपात भाजपने चिराग पासवान यांना झुकतं माप दिलं त्यामुळे नाराज होत पशुपती पारस यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तसेच चिराग पासवान यांनी हाजीपुर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी सुद्धा पशुपती पारस हजर नव्हते. त्यानंतर सोमवारी पीएम मोदींनी बिहारमध्ये तीन रॅली केल्या. यातील एक रॅली हाजीपूरमध्ये होती. या मतदारसंघातून लोजपा रामविलास पासवान पक्षाचे नेते चिराग पासवान स्वतः उमेदवार आहेत.

चिराग पासवानला बिहारमध्ये पाच जागा

सध्या पशुपती पारस या मतदारसंघाचे खासदार आहेत. जागावाटपात भाजपने हाजीपूरसह पाच जागा चिराग पासवान यांच्या पक्षाला देऊन टाकल्या. पशुपती पारस यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. कारण लोक जनशक्ती पार्टीत फूट पडल्यानंतर पशुपती पारस यांच्याबरोबर गेलेले पाच खासदार मागील निवडणुकीत या मतदारसंघांतून विजयी झाले होते. परंतु तरीही भाजपने त्यांना साइडलाइन करत चिराग पासवान यांना महत्व दिलं.

मैं फकीर हूं! मोदींकडे घर, जमीन-जुमला अन् गाडी काहीच नाही पण..,

काका आले असते तर..

यानंतर चिराग पासवान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी सुद्धा पशुपती पारस हजर नव्हते. यावेळी चिराग पासवान म्हणाले होते, की जर आज काका येथे आले असते तर मी पक्ष तोडण्याच्या सर्व गोष्टी सोडून दिल्या असत्या. उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी आपण यावं असे मी त्यांना फोन करून म्हणालो होतो. पण त्यांनी माझा फोन कट केला, असेही चिराग यावेळी म्हणाले होते. हाजीपूर चिराग पासवान यांचे वडील रामविलास पासवान यांचा पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे. ते या मतदारसंघातून अनेक वेळा विजयी झाले आहेत. 2019 मध्ये ज्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचा विचार सोडून दिला त्यावेळी बंधू पशुपती पारस यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.

follow us