Bihar Politics : उमेदवार निवडीत पॉलिटिक्स; एकाच वेळी 22 नेत्यांनी सोडली चिराग पासवानांची साथ

Bihar Politics : उमेदवार निवडीत पॉलिटिक्स; एकाच वेळी 22 नेत्यांनी सोडली चिराग पासवानांची साथ

Bihar Politics LJPR Leaders Resignation : देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू (Lok Sabha Election) आहे. सध्याच्या काळात राजकीय पक्षांच्या जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. ज्या जागा निश्चित होत आहेत तेथे उमेदवारांची घोषणा केली जात आहे. मात्र या उमेदवारांच्या घोषणेबरोबरच बंडखोरी आणि राजीनामा नाट्याचा सामना वरिष्ठ नेत्यांना करावा लागत आहे. असाच खळबळजनक प्रकार बिहार राज्यात (Bihar Politics) घडला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीवरून नाराज झालेल्या लोक जनशक्ती पार्टीच्या तब्बल 22 राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना उमेदवारी देण्याचा चिराग पासवान यांच्या (Chirag Paswan) निर्णयामुळे या नेत्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, याआधी जागावाटपात एकही जागा मिळाले नाही म्हणून चिराग पासवान यांचे काका पशुपति पारस यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळीही त्यांनी चिराग पासवान यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बिहारच्या राजकारणात ही आणखी एक मोठी घटना घडली आहे. या नेत्यांनी राजीनामे दिल्यानंतर चिराग पासवान यांनीही डॅमेज कंट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

बिहारमधील सत्ताधारी एनडीए आघाडीतील घटक पक्ष लोक जनशक्ती पक्षाला 5 जागा मिळाल्या आहेत. या जागांसाठी उमेदवार निवडीसाठी पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्याकडून ज्या पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत त्यावर नेतेमंडळी नाराज आहेत. या नाराजीतूनच त्यांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रेणू कुशवाहा, राष्ट्रीय महासचिव सतीश कुमार, प्रदेश संघटन सचिव ई रवींद्र सिंह, मुख्य संघटन विस्तारक अजय कुशवाहा, प्रदेश उपाध्यक्ष संजय सिंह, प्रदेश महासचिव राजीव दांगी आणि अन्य नेते मंडळींचा समावेश आहे. या सर्व नेत्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. इतकेच नाही तर या नेत्यांनी चिराग पासवान यांच्यावर तिकीट विक्रीचे गंभीर आरोप देखील केले आहेत.

Bihar Politics : बिहारमध्ये NDA ला धक्का! जागावाटपानंतर केंद्रीय मंत्र्यांचा थेट राजीनामा

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी चिराग पासवान यांनी पाच जागांवर उमेदवारांची घोषणा केली होती. पक्षाने जी यादी जाहीर केली होती त्यात हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून चिराग पासवान, वैशाली मतदारसंघातून विद्यमान खासदार वैशाली सिंह, जमुई मतदरसंघातून अरुण भारती, समस्तीपूर मतदारसंघातून शांभवी चौधरी आणि खडगिया मतदारसंघातून राजेश वर्मा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गुरुवारी बिहारमध्ये आगामी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. जमुई येथे एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. जागावाटपात हा मतदारसंघ चिराग पासवान यांच्या पक्षाला मिळाला आहे. याच मतदारसंघातून स्वतः चिराग पासवान दोन वेळा खासदार राहिले आहेत. यावेळी त्यांनी ही जागा अरुण भारती यांच्यासाठी सोडली आहे. या मतदारसंघात पीएम मोदी रॅली काढणार आहेत.

Bihar Politics : PM मोदींच्या सभेत चिराग ‘इन’ नितीश ‘आऊट’ बिहार NDA मध्ये पुन्हा धुसफूस?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube