लालूंनी मोदींचा परिवार विचारून केली चूक? विरोधकांची टीकाच भाजपसाठी इलेक्शन टॉनिक!

लालूंनी मोदींचा परिवार विचारून केली चूक? विरोधकांची टीकाच भाजपसाठी इलेक्शन टॉनिक!

Lok Sabha Election : ‘मैं भी चौकीदार हूं’.. ‘चाय पे चर्चा’.. ‘अच्छे दिन आने वाले है’… हे शब्द आठवतात का? हे शब्द साधेसुधे नाहीत तर हे तेच शब्द आहेत ज्यांनी अख्ख्या लोकसभा निवडणुकीचं पारडं फिरवलं. काँग्रेसच्या नेत्यांनी या शब्दांचा आधार घेत भाजपवर तिखट हल्ला तर केलाच शिवाय यूपीए सरकारच्या कामगिरीचं कौतुकही केलं होतं. पण आता हेच शब्द पुन्हा आठवायला निमित्त ठरले आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव. मागील महिन्यात पाटणा शहरात इंडिया आघाडीची एक रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत लालू यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका केली. पंतप्रधान मोदी घराणेशाहीच्या राजकारणावर टीका करतात पण ते का सांगत नाहीत की त्यांचा परिवार का नाही? असा सवाल लालू यादव यांनी विचारला.

लालू यादवांची टीका अन् तयार झाला ‘मोदी का परिवार’

आता लालू प्रसाद यादव यांचं हेच वक्तव्य भाजपने मॉडिफाय करण्याचं ठरवलं. लालू यादव यांच्या या टीकेला उत्तर देण्यासाठी मोदींनी तेलंगणातील आदिलाबाद शहराची निवड केली. विरोधकांनी सांगितलं की मोदीला तर परिवारच नाही पण मी सांगतो की देशातील एक एक सदस्य माझा परिवार आहे, असे मोदी म्हणाले. भाजप नेत्यांनी याला  साथ देत त्यांच्या ट्विटर अकाउंटवरील प्रोफाइल चेंज केले. आपल्या नावापुढे “मोदी का परिवार” असे शब्द जोडले. आगामी निवडणुकीत हाच मुद्दा देशाच्या राजकारणात चर्चेत राहील याची व्यवस्था भाजपने केली.

आता लालू प्रसाद यादव यांनी वक्तव्य केल्यानंतर भाजप नेत्यांनी त्याला ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला आहे त्यावरून स्पष्ट संकेत मिळत आहेत की भाजप याला निवडणुकीत मोदी का परिवार कँपेन म्हणून चालवणार आहे.

Loksabha Election: गोविंदाची पुन्हा राजकारणात एन्ट्री! शिवसेनेत पक्षप्रवेश, उत्तर-पश्चिम मुंबईतून रिंगणात उतरणार?

काँग्रेसचा ‘चौकीदार चोर’ नारा, भाजपाचं ‘मैं भी चौकीदार’ कॅम्पेन

प्रधानमंत्री मोदी आणि भाजपच्या पॅटर्नकडे नजर टाकली तर लक्षात येते की असेच काहीसे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा घडले होते. फ्रान्स बरोबरील राफेल विमानांच्या सौद्यावरून राहुल गांधी यांनी पीएम मोदी आणि भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. या डीलमध्ये प्रधानमंत्र्यांनी चोरी केली आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यानंतर त्यांनी ‘चौकीदार चोर है’ या नावाने कॅम्पेनही चालवले. या काळात काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला होता.

परंतु भाजपने या आरोपालाच मॉडीफाय केले आणि निवडणूक अभियान तयार केले. ‘मैं भी चौकीदार हुं’ असे हे अभियान होते. यानंतर निवडणुकीचे निकाल लागले त्यावेळी असे दिसून आले की 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या होत्या. 2014 मध्ये 283 जागा मिळाल्या होत्या तर 2019 मध्ये 303 जागा मिळाल्या. यानंतर काँग्रेसमध्येच अंतर्गत कलह सुरू झाला. पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचे असे मत होते की राहुल गांधींची धोरणे आणि पीएम मोदींवर व्यक्तिगत टीका यांमुळे काँग्रेसला दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले.

Loksabha Election 2024 : मावळात पुन्हा बारणेंना संधी पण धनुष्यबाण पेलणार का?

‘अच्छे दिन आने वाले है’, मनमोहन सिंहांनी दिलं टायटल

2019 मधील निवडणुकीचा मुद्दा सोडून दिला तरी असे अनेक प्रसंग घडले आहेत ज्यावेळी विरोधकांनी मोदींवर व्यक्तिगत टीका केली आहे. पुढे मोदी याच टीकेला जनतेशी जोडून त्याचे रूपांतर एका कॅम्पेनमध्ये करत होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकांआधी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात ‘अच्छे दिन आने वाले है’ असे वक्तव्य केले होते. याच वक्तव्याला भाजपने आपले निवडणूक कॅम्पेन म्हणून चालवले होते.

चहावाला पीएम ते ‘चाय पे चर्चा’ 

2014 च्या निवडणुकी दरम्यान काँग्रेस नेत्यांनी मोदींना चहावाला म्हणून वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला होता. यावर पलटवार करण्याऐवजी मोदींनी ‘चाय पे चर्चा’ हा भन्नाट कार्यक्रम सुरू केला. मोदींची ही आयडिया आजही देशात प्रचंड लोकप्रिय आहे. एकूणच यावरून दिसून येते की विरोधकांकडून होणारी टीका, आरोपांना भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जातेच पण काही वेळेस शक्कल लढवून त्याचा निवडणुकीतही फायदा करून घेतला जातो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज