भिवंडीत काँग्रेसच्या पाठिंब्याने महापौर, राहुल गांधी देखील तिथेच येणार पण कशासाठी..
Rahul Gandhi: सोनाळे येथे झालेल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचे विधान केले होते.
प्रशांत गोडसे, प्रतिनिधी
मुंबई : भिवंडी महापालिकेत काँग्रेस (Congress) प्रणित ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’च्या माध्यमातून सत्तांतर घडवून आणण्यात काँग्रेसला यश आले आहे. भाजपाच्या बंडखोर नगरसेवक गटाकडून नारायण चौधरी (Naryan Chudhari) यांची महापौरपदी निवड झाली असून, उपमहापौरपदी काँग्रेसचे नगरसेवक तारीक मोमीन विराजमान झाले आहे. या निवडीत भाजपच्या काही नगरसेवकांनी आघाडीला पाठिंबा दिल्याने काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.महापौरपदी नारायण चौधरी तर उपमहापौरपदी तारिक मोमीन यांची निवड झाल्यानंतर शहरातील राजकीय समीकरणे बदललीत. भाजपमधील अंतर्गत नाराजीचा फायदा घेत काँग्रेसने आघाडी मजबूत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यातच उद्या विरोधीपक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) भिवंडी शहरात येत असल्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसत आहे. विरोधी पक्षांची राहुल गांधी भिवंडीत कशासाठी येणार आहे जाणून घेऊया.
युद्धाचा पर्याय इराणसाठी फायदेशीर? जागतिक शक्तींची सावध भूमिका; अमेरिका एकटी पडणार?
विरोधीपक्ष नेता भिवंडीत का येतोय ?
2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे झालेल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचे विधान केले होते. त्या वक्तव्याविरोधात आरएसएसचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात आवमान याचिका दाखल केली होती.या प्रकरणात साक्षी-पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून, फिर्यादी राजेश कुंटे यांची सरतपासणी व उलटतपासणी पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच तपास अधिकारी सायकर यांची सरतपासणी नोंदविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, राहुल गांधी यांचे जामीनदार आणि माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील (चाकूरकर) यांचे निधन झाल्याने न्यायालयात नवीन जामीनदार सादर करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठीच राहुल गांधी प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांचे वकील नारायण अय्यर यांनी दिली आहे.
‘माया’च्या कथेला नवी उंची देणारे ‘मन गाईना सुरात’ गाणे प्रदर्शित
‘काँग्रेसमुक्त भारत’ नारा मात्र भिवंडीत कॉग्रेस युक्त
‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा देणाऱ्या भाजपा बंडखोर नगरसेवकांनी स्थानिक पातळीवर युती करत असतानाच भाजपची मातृसंस्था मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कडूनच राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या राजकीय समीकरणांमध्ये भिवंडीत होत असलेल्या सत्तांतरानंतर राहुल गांधी यांच्या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागले आहे. स्थानिक राजकारणातील या विरोधाभासी परिस्थितीत भिवंडी काँग्रेसकडून राहुल गांधी यांना कोणता राजकीय संदेश दिला जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. उद्याच्या दौऱ्यात राहुल गांधी काय बोलता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर दुसरीकडे भाजपाकडून राहुल गांधी यांच्या विरोधात कोणती प्रतिक्रिया येते पाहणे महत्वाचे असणार आहे.
