Download App

राहुल, लालू, पासवान अन् शिंदे.. पाचव्या टप्प्यात घराणेशाहीच्या वारसदारांची परीक्षा

लोकसभा निवडणुकीच्या पाचवा टप्प्यात देशातील राजकारणी कुटुंबांतील सदस्य निवडणूक रिंगणात आहेत.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा शनिवारी (Lok Sabha Election 2024) थंडावल्या. आता सोमवारी 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 49 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यातही अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमाणेच अन्य काही केंद्रीय मंत्रांचे भवितव्य सोमवारी ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. पाचवा टप्पा यासाठी सुद्धा महत्वाचा आहे कारण या टप्प्यात राजकारणी कुटुंबांतील सदस्य निवडणूक रिंगणात आहेत.

राजकारणातील घराणेशाहीवर भाजप नेतांकडून सडकून टीका केली जात असली तरी निवडणुकीत मात्र अनेक राजकीय घराण्यांतील अनेक वारसदारांनी शड्डू ठोकले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र प्रत्येक ठिकाणी राजकीय वारसदार एकतर स्वतः चे राजकारण सेट करताना दिसत आहेत किंवा नवी इनिंग सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत.

रायबरेलीत राहुल गांधींची परीक्षा

उत्तर प्रदेशच्या राजकारणावर नजर टाकली तर पाचव्या टप्प्यात राज्यातील 14 मतदारसंघात मतदान होणार आहे. यातील तीन मतदारसंघ असे आहेत जिथे राजकीय मंडळींचे वारसदार आपल्या राजकारणाला धार देण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेठी सोडून राहुल गांधी यंदा पहिल्यांदाच रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. सन 2004 पासून राहुल गांधी खासदार आहेत. फक्त मागील निवडणुकीत अमेठी मतदारसंघात स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला होता. परंतु केरळमधील वायनाड मतदारसंघात विजयी होत खासदारकी कायम ठेवण्यात ते यशस्वी ठरले होते.

आता राहुल गांधी रायबरेली मधून नशीब आजमावत आहेत. काँग्रेस पक्षाने मतदारसंघात जोरदार प्रचार केला आहे. सन 2004 मध्ये सोनिया गांधी अमेठी सोडून रायबरेलीत आल्या होत्या. तेव्हापासून या मतदारसंघातून त्या विजयी होत आल्या आहेत. आता या मतदारसंघातून राहुल गांधी मैदानात आहेत. अमेठी मतदारसंघात राहुल गांधी यांची वडील माजी पंतप्रधान राजीव गांधी चार वेळेस निवडून आले होते. तर रायबरेली मतदारसंघातून सोनिया गांधी पाच वेळेस खासदार राहिल्या आहेत. आता रायबरेलीतील जनता राहुल गांधींना साथ देणार का याचं उत्तर ४ जूनलाच मिळेल.

बाराबंकीत दिग्गज काँग्रेसीचा मुलगा मैदानात

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ शेजारील बाराबंकी मतदारसंघात सुद्धा राजकीय वारसदार नशीब आजमावत आहे. या मतदारसंघात काँग्रेसने तनुज पुनिया यांना तिकीट दिले आहे. तनुज हे दिग्गज काँग्रेस नेते पीएल पुनिया यांचे पुत्र आहेत. पीएल पुनिया येथून यशस्वी झाले आहेत. ते एकदा राज्यसभेचे खासदारही राहिले आहेत. आयआयटी रुडकी येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या तनुज पुनिया यांना काँग्रेसने चौथ्यांदा तिकीट दिले आहे. याआधी 2017 आणि 2022 मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रसने त्यांना तिकीट दिले होते. 2019 मधील लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

वादग्रस्त बृजभूषण सिंह यांच्या वारसदाराची परीक्षा

यंदा युपीतील कैसरगंज मतदारसंघ यंदा विशेष चर्चेत राहिला आहे. या मतदारसंघात भाजप ब्रुजभूषण सिंह यांना तिकीट देईल का याची चर्चा सुरू होती. पण भाजपने त्यांचा पत्ता कट करत मुलगा करण भूषण सिंह यांना तिकीट दिले. मागील काही दिवसांपासून ब्रजभूषण सिंह वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे यंदा त्यांना तिकीट नाकारल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात आहे.

करण सिंह डबल ट्रॅप शूटिंगचे राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू आहेत. त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीने भगतराम मिश्र यांना तिकीट दिले आहे. वकील भगतराम मिश्र माजी खासदार दद्दन मिश्र यांचे भाऊ आहेत. भगतराम यांच्या पत्नी जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष राहिल्या आहेत.

बारामुलात ओमर अब्दुल्ला पुन्हा मैदानात

जम्मू काश्मीर मधील बारामुला मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोन टक्कर देत आहेत. देशातील राजकारणी घराण्यात अब्दुल्ला परिवाराचे नाव घेतले जाते. देशात हेच एक असे कुटुंब आहे ज्यांच्या तीन पिढ्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे.

बिहारमध्ये लालूंच्या मुलीची नवी इनिंग

बिहारच्या राजकारणात घराणेशाहीच्या राजकारणाचा दबदबा आजही आहे. यंदाच्या निवडणुकीतही राजकारणी परिवाराची तिसरी पिढी मैदानात आहे. सारण मतदारसंघाची विशेष चर्चा होत आहे. या मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री आणि राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य रिंगणात आहे. मतदारसंघ लालू परिवाराचा बालेकिल्ला मानला जातो. येथून लालू यादव आणि राबडी देवी यांनी निवडणूक लढलेली आहे. या मतदारसंघातून लालू प्रसाद यादव चार वेळा निवडून आले आहेत.

आता या मतदारसंघातून रोहिणी आचार्य राजकारणाची नवी इनिंग सुरू करण्याच्या तयारीत आहेत. परंतु त्यांच्या समोर आव्हान सोपे नाही. माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी त्यांना कडवे आव्हान देत आहेत. या मतदारसंघात रुडी चार वेळेस निवडून आले आहेत. 2014 मधील निवडणुकीत तर रुडी यांनी राबडी देवी यांचाही पराभव केला होता. 2019 मध्ये चंद्रिका राय यांचा पराभव केला होता. बिहार मधील आणखी एक मतदारसंघ आहे तो म्हणजे हाजीपुर. या मतदारसंघात दिग्गज नेते राम विलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान मैदानात आहेत. याआधी त्यांनी जमुईमधून 2014 आणि 2019 मध्ये विजय मिळवला होता. यावेळी त्यांनी मतदारसंघ बदलला आहे.

कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हॅट्ट्रीक साधणार का?

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याण मतदारसंघातून विजयी हॅटट्रिक साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने वैशाली दरेकर यांना तिकीट दिले आहे.

follow us

वेब स्टोरीज