Download App

‘MP’ मध्ये सुपडा साफ, काँग्रेसमध्ये वाढला वाद; दिग्विजय-कमलनाथ रडावर

लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याने पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे.

Madhya Pradesh Politics : लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेसचा सुपडा (Madhya Pradesh Politics) साफ झाल्याने पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. राज्यातील सर्व 29 जागा जिंकत भाजपने यंदाही काँग्रेसला चारीमुंड्या (Congress) चीत केले. या नामुष्कीजनक पराभवानंतर काँग्रेसअंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. या पराभवाला माजी मुख्यमंत्री कमलनाथ, दिग्विजय सिंह यांच्यासह जितू पटवारी हेच जबाबदार आहेत असा आरोप काँग्रेस नेते अजय सिंह यांनी केला आहे.

अजय सिंह म्हणाले, प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला गेला पाहिजे. कारण त्यांच्या कार्यकाळातच नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पक्ष सोडला होता. ज्यावेळी नेते पक्ष सोडत होते त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी काय केले यावर आता चर्चा झाली पाहिजे. पराभव कशामुळे झाला याची उत्तरं आता मिळवली पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली.

मध्य प्रदेशात भाजप सेफ, काँग्रेस मात्र फेल; २८ वर्षांच्या राजकारणात भाजप सरस

यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्यावरही निशाणा साधला. निवडणुकीच्या काळात हे दोन्ही नेते त्यांच्या मतदारसंघातून बाहेर का पडले नाहीत, निवडणुकीत त्यांनी नेमका कुणासाठी प्रचार केला याची माहिती पक्ष नेतृत्वाने घेतली पाहिजे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी आणि आमदार रामनिवास रावत यांसारख्या नेत्यांनी पक्ष सोडला. स्वार्थी नेत्यांनी संकटाच्या काळात पक्ष सोडला आता त्यांना पुन्हा पक्षात कधीच घेतले जाऊ नये असेही अजय सिंह म्हणाले.

अजय सिंह मध्य प्रदेशचे माजी मु्ख्यमंत्री अर्जुन सिंह यांचे पुत्र आहेत. अर्जुन सिंह काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते होते. ज्यावेळी 2013 मध्ये निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला होता त्यावेळी जबाबदारी स्वीकारुन मी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता अशी आठवणही अजय सिंह यांनी यावेळी सांगितली. आता या पराभवाची जबाबदारी कुणाला तरी घ्यावीच लागेल कारण याआधीही कधीही काँग्रेस पक्षाचा इतका दारुण पराभव झाला नव्हता असे अजय सिंह म्हणाले.

BJP कडून मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर, शिवराज सिंह यांना डच्चू?

2014 आणि 2019 मधील लोकसभा निवडणुकांचा विचार केला तर या राज्यात भाजपची कामगिरी शानदार अशीच राहिली आहे. 29 जागा असणाऱ्या या राज्यात भाजपने अनुक्रमे 27 आणि 28 जागा जिंकल्या होत्या. 2014 मधील निवडणुकीत गुना आणि छिंदवाडा या दोनच मतदारसंघात काँग्रेस भाजपला पराभूत करू शकली. तर 2019 मधील निवडणुकीत फक्त छिंदवाडामध्ये काँग्रेसला विजय मिळाला होता. 2014 मधील निवडणुकीत गुना मतदारसंघातून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि छिंदवाडा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांनी विजय मिळवला होता. आता मात्र भाजपने सर्वच्या सर्व जागा जिंकत काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे.

follow us