Download App

UP Election Result : अतिकच्या प्रभागात भाजपचे पानिपत! पाहा, कुणी मारली बाजी ?

UP Election Result 2023 : उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने (BJP) पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी केली आहे. कर्नाटकच्या जनतेने भाजपाची साथ सोडली असली तरी उत्तर प्रदेशातील स्थानिक निवडणुकीत पक्षाने चांगले यश मिळवले आहे. या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी माफिया अतीक अहमद (Atique Ahmed) आणि त्याच्या कुटुंबाचा किस्सा चांगलाच चर्चेत होता.

त्यामुळे या निवडणुकीत सर्वांचे लक्ष प्रयागराजमधील प्रभाग 44 मधील मतमोजणीकडे लागले होते. हा प्रभाग अतिकचा बालेकिल्ला होता. अतिकची या भागात मोठी दहशत होती. मात्र, येथे भाजपाचा पराभव झाला आहे. समाजवादी पार्टीने भाजपला पराभूत केले.

UP Election Result 2023: योगी आदित्यनाथ यांनी सपा, बसपा आणि काँग्रेसला पुन्हा चितपट केले

प्रयागराज महापालिकेच्या प्रभाग 44 मध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला. निवडणूक प्रचारादरम्यान भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी अतिकच्या विरोधात प्रचार केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रयागराजमध्ये रॅली काढताना रामचरितमानसच्या पाठातून माफियांवर निशाणा साधला होता.

प्रचारात भाजपने माफियाराज संपविणार असल्याचे म्हटले होते. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाने योगी सरकारवर दहशत आणि अराजकतेचा आरोप केला होता. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात प्रयागराजची भूमी अत्याचार सहन करत नाही. निसर्ग नक्कीच न्याय करतो. जो जसे करतो त्याला त्याचे फळ मिळते. ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळाला, असे आदित्यनाथ म्हणाले होते.

उमेश पाल हत्या प्रकरणानंतर योगी सरकारने केलेल्या कारवाईत असदे एन्काउंटर झाले. त्यानंतर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांचीही हत्या करण्यात आली. त्यामुळे उत्तर प्रदेश चर्चेत आले होते. त्यानंतर येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपने मात्र सपा, काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांचा सुपडा साफ केला.

दरम्यान, यूपीमधील 760 नगरपालिकांमध्ये 4 मे आणि 11 मे रोजी दोन टप्प्यात मतदान झाले होते. (UP Election Result 2023) पहिल्या टप्प्यात 52 टक्के तर दुसऱ्या टप्प्यात 53 टक्के मतदान झाले होते. यूपीमध्ये 17 महानगरपालिका, 199 नगरपालिका आणि 544 नगर पंचायतीच्या जागा आहेत. पहिल्या टप्प्यात 9 मंडलांतील 37 जिल्ह्यांतील 10 महानगरपालिका, 820 नगरसेवक, 103 नगरपरिषद अध्यक्ष, 2740 नगरपरिषद सदस्य, 275 नगर पंचायत अध्यक्ष आणि 3745 नगर पंचायत सदस्यांसाठी निवडणूक झाली आहे. दुसरीकडे, दुसऱ्या टप्प्यात 9 विभागांतील 38 जिल्ह्यांतील 7 महानगरपालिका, 95 नगरपालिका, 267 नगर पंचायती आणि नगरसेवकांच्या जागांसाठी निवडणूक झाली.

Tags

follow us