Download App

Smile Ambassador : सचिनच्या खांद्यावर बंदूक ठेवत राष्ट्रवादीने ठेवलं भाजपच्या मर्मावर बोटं

NCP’s question to Sachin Tendulkar : मागील काही दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतरवर महिला कुस्तीगीरांचे आंदोलन सुरु आहे. भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. परंतु इतके दिवस झाले तरीही बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई होत नाही. महिला कुस्तीपटूंना मोठ्या प्रमाणात सामन्य जनतेचा पाठिंबा मिळत आहे पण क्रिडा आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज मंडळी अजून गप्प आहेत. यावरुन क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकरला राष्ट्रवादीने खोचक सवाल केला आहे.

क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरची राज्याच्या स्वच्छ मुख अभियानासाठी महाराष्ट्राचा स्माइल अँबेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. यावर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी सचिन तेंडुलकरला उद्देशून म्हटलं आहे की प्रिय सचिन, हे ऐकून आनंद झाला की भाजपच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने राज्याच्या स्वच्छ मुख अभियानासाठी स्माइल अँबेसिडर म्हणून तुझी नियुक्ती करण्यात आली आहे. पण, तुला माहितीय का, याच भाजपाने त्यांचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना पाठिशी घालत आपल्या कुस्तीपटूंचं हसू हिरावून घेतलं आहे.

क्रास्टो यांनी लिहिलं आहे की, सचिन कुस्तीगीर न्याय मागत आहेत पण भाजपा त्यांच्या खासदाराला वाचवण्यासाठी कुस्तीगीरांच्या आंदोलनाकडे डोळेझाक करत आहे. जसा तू आमचा अभिमान आहेस, तशाच आपल्या देशातील महिला कुस्तीपटूही आमचा अभिमान आहेत. एक खेळाडू म्हणून तू तुझ्या बांधवांना पाठिंबा दिला पाहिजेस, हे आपलं कर्तव्य आहे. आम्हाला आशा आहे की, तू यावर बोलशील आणि आपल्या कुस्तीपटूंचा स्माइल अँबेसिडर होशील.

Tags

follow us