Nike Layoff Sales drop in China Nike Job cuts planned alongside setting up a campus in India : स्पोर्ट्सवेअर क्षेत्रातील दिग्गज कंपनी Nike ने आणखी नोकऱ्यांमध्ये कपात करण्याची आणि आपल्या जागतिक व्यवसायाच्या रचनेत मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे. संपूर्ण वर्षाच्या महसुलाबाबत अपेक्षेपेक्षा अधिक घसरण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने हा निर्णय गेतला आहे. CEO एलियट हिल यांच्या नेतृत्वाखाली Nike आपल्या या व्यावसायातील बदलांना आणखी वेग देत आहे. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या कंपनीच्या आर्थिक अंदाजामुळे Nike च्या अडचणी पुढील काही तिमाहींमध्येही कायम राहण्याची शक्यता दिसत आहे. विशेषतः चीनमधील परिस्थिती कंपनीसाठी चिंतेची ठरत आहे. स्थिर चलनाच्या आधारावर पहिल्या तिमाहीत चीनमधील Nike ची विक्री तब्बल 26 टक्क्यांनी घसरली आहे.
पहिल्या तिमाहीत विक्रीत 4 टक्के घट
आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जून ते ऑगस्ट 2026 या कालावधीत Nike ची विक्री सुमारे 4 टक्क्यांनी घटून 1,121 कोटी डॉलर झाली. मात्र, वेअरहाऊसिंग आणि लॉजिस्टिक्सचा खर्च कमी झाल्याने कंपनीच्या ग्रॉस मार्जिनमध्ये 60 बेसिस पॉइंट्सची वाढ झाली असून ते 42.8 टक्क्यांवर पोहोचले. कंपनीचे निकाल जाहीर झाल्यानंतर एक्स्टेंडेड ट्रेडिंगमध्ये Nike च्या शेअरमध्ये 8.5 टक्क्यांची घसरण झाली. दरम्यान, ब्लू-चिप कंपन्यांच्या निर्देशांकात जवळपास 18 वर्षे स्थान टिकवून ठेवलेल्या Nike ला सप्टेंबरमध्ये S&P Dow Jones ने तिमाही पुनर्संतुलनादरम्यान S&P 100 निर्देशांकातून वगळले.
Nike समोर नेमक्या अडचणी काय?
एलियट हिल यांच्या नेतृत्वाखालील सुरुवातीच्या दोन वर्षांत Nike पुन्हा एकदा विकासाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी कंपनी रनिंगसारख्या महत्त्वाच्या क्रीडा प्रकारांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. त्याचबरोबर घाऊक विक्रेत्यांसोबतचे संबंधही पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, विश्लेषकांच्या मते Nike च्या अडचणींचे एक प्रमुख कारण म्हणजे ग्राहकांना आकर्षित करतील अशी पुरेशी नवीन उत्पादने बाजारात आणण्यात कंपनीला आलेले अपयश. त्यामुळे विक्री वाढवण्यासाठी कंपनीला मोठ्या प्रमाणावर प्रमोशन आणि सवलतींचा आधार घ्यावा लागला आहे.
कंपनीचे CEO एलियट हिल यांनी निकालानंतरच्या कॉन्फरन्स कॉलमध्ये सांगितले की, Nike चा परफॉर्मन्स व्यवसाय अद्याप इतका मोठा झालेला नाही की Nike Sportswear, Jordan Brand आणि Greater China या विभागांवर येणाऱ्या दबावाची भरपाई करता येईल. या व्यवसायांना पुन्हा मजबूत होण्यासाठी काही काळ लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
साखरेच्या किंमती घसरणार? वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर सरकारने उचललं मोठं पाऊल
Nike ने आपल्या ऑपरेटिंग मॉडेलमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचाही समावेश आहे. यापुढे कंपनीच्या जागतिक व्यवसायाची विभागणी चारऐवजी तीन प्रमुख भागांमध्ये केली जाणार आहे. अमेरिका आशिया-पॅसिफिक आणि ग्रेटर चायना EMEA — युरोप, मिडल ईस्ट आणि आफ्रिका याशिवाय Nike भारतात एक नवीन कॅम्पस सुरू करण्याच्या तयारीत आहे.
किती नोकऱ्यांवर परिणाम होणार?
कंपनीने अद्याप किती कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे, याचा अंतिम आकडा जाहीर केलेला नाही. याबाबत कर्मचाऱ्यांना 2027 मध्ये माहिती दिली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. यापूर्वीही Nike ने याच वर्षाच्या सुरुवातीला कर्मचारी कपातीची घोषणा केली होती. या पुनर्रचनेमुळे आर्थिक वर्ष 2031 पर्यंत कंपनीला सुमारे 250 कोटी डॉलरची बचत होण्याची अपेक्षा आहे. यातील बहुतांश बचत आर्थिक वर्ष 2029 आणि 2030 मध्ये साध्य होईल, असा कंपनीचा अंदाज आहे.
