स्वातंत्र्यावेळी 1947 मध्ये सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक बनलेले सेंगोल आता नवीन संसद भवनात स्थापित केले जाणार आहे. यामुळे सेंगोल सारखा इतका महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा, जो विस्मरणात गेला होता, त्याचे महत्त्व आता देशाला समजण्यास मदत होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत सेंगोलबाबत माहिती दिली. तसेच त्याचे महत्त्व सांगितले. (Noted classical dancer Padma Subrahmanyam wrote a letter to the Prime Minister’s Office in 2021, translating a Tamil article on Sengol)
अमित शाह यांनी यावेळी सेंगोल आत्तापर्यंत कुठे आणि कोणत्या स्थितीत होता याबद्दल सविस्त माहिती दिली. सेंगोलबद्दल माहिती देताना शाहंनी सांगितले की, सेंगोल शोधण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: अधिकाऱ्यांना दिले होते. नवीन संसद भवनाच्या बांधकामादरम्यान त्यांनी संबंधित सर्व तथ्ये आणि इतिहासाचे संशोधन करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्रावरून त्यांना सेंगोल बद्दलची माहिती मिळाली, अशी माहिती आता समोर आली आहे. हे पत्र सुप्रसिद्ध नृत्यांगना पद्मा सुब्रह्मण्यम यांनी पंतप्रधान कार्यालयाला लिहिले होते. पंतप्रधान कार्यालयाला सेंगोलबद्दल 2 वर्षांपूर्वी हे पत्र मिळाले होते.
द हिंदूमधील वृत्तानुसार, पद्मा सुब्रमण्यम यांनी या पत्रात सेंगोलचे महत्व सांगणारी माहिती दिली होती. यासाठी त्यांनी एका तामिळ मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखाचा हवाला दिला. या लेखात 14 ऑगस्ट 1947 च्या रात्री पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी सेंगोलने सत्ता हस्तांतरित केल्याचे नमूद केले होते.
पद्मा सुब्रमण्यम या भरतनाट्यमच्या प्रसिद्ध नृत्यांगना आहेत, त्यांचा जन्म 1943 मध्ये झाला होता. त्यांचे वडील प्रसिद्ध चित्रपट निर्माता होते तर आई संगीतकार होती. पद्मा सुब्रमण्यम यांनी वयाच्या 14 व्या वर्षी वडिलांच्या डान्स स्कूलमध्ये मुलांना नृत्य शिकवायला सुरुवात केली. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार आणि पारितोषिके मिळाली आहेत.
पद्मा सुब्रमण्यम यांचा 1981 मध्ये पद्मश्री, 1983 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि 2003 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. याशिवाय आशियातील विकास आणि समरसतेसाठी सोव्हिएत युनियनकडून नेहरू पुरस्कार आणि जपानच्या फुकुओकाचा आशियाई संस्कृती पुरस्काराच्याही त्या मानकरी ठरल्या आहेत.
या अनमोल वारश्याबद्दल माहिती देणारा लेख मे 2021 मध्ये प्रकाशित झाला होता. एका रिपोर्टनुसार, जेव्हा पद्मा सुब्रमण्यम यांनी हा लेख वाचला तेव्हा त्यांना जाणवले की या वारशाबाबत सर्वांना माहिती मिळाली पाहिजे. त्यानंतरच त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून पंतप्रधानांनी याबाबत देशवासियांना सांगावे, अशी मागणी केली होती.
पंतप्रधान कार्यालयाने हे पत्र अत्यंत गांभीर्याने घेतले, पंतप्रधान मोदींना याची माहिती देण्यात आली. विशेषत: सेंगोल शोधण्याचे आदेश पंतप्रधानांनी स्वतः दिले होते. यानंतर अधिकाऱ्यांच्या पथकाने ‘इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट’च्या मदतीने शोध सुरू केला, मात्र त्यांना शोध लागला नाही.
यानंतर अधिकाऱ्यांनी त्यावेळच्या वर्तमानपत्रांचा शोध घेतला. त्यात तामिळनाडूच्या वुम्मीदी बंगारू कुटुंबाने सेंगोल बनविल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावर अधिकाऱ्यांच्या टीमने बंगारू कुटुंबाची भेट घेतली. तेव्हा त्यांनीही मान्य केले की, सेंगोल त्यांनीच बनविला होता. मात्र तो आता कुठे आहे हे याबाबतची त्यांना कल्पना नव्हती. यानंतर देशभरातील इतर संग्रहालयांमध्येही त्याची माहिती घेण्याचे आदेश देण्यात आले.
अखेर अलाहाबादच्या आनंद भवनात सेंगोलसारखी एक काठी सापडली. हे सेंगोल आहे हे कोणालाच माहीत नव्हते. वर्तमानपत्रातही याचा फोटो नव्हता. अखेरीस या सेंगोलचा एक फोटो तामिळनाडूतील त्याच बंगारू कुटुंबाला दाखविण्यात आला. त्यांनी हेच सेंगोल असल्याचे मान्य केले. 1947 मध्ये, वुम्मीदी अथुराजुलु आणि वुम्मीदी सुधाकर यांनी हे सेंगोल बनिवले होते. आता हे दोन्ही भाऊ 28 मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.