Chhatrapati Sambhajinagar PWD Recruitment Scam : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) सार्वजनिक बांधकाम विभागात एक मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. कोणतीही जाहिरात, अधिकृत भरती प्रक्रिया किंवा परीक्षा न घेता, फक्त स्कॅन आणि मॉफ करून बनवलेल्या सह्यांचा आधार घेत 31 जणांना शासकीय सेवेत भरती (PWD Recruitment Scam) केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा घोटाळा गेल्या दहा वर्षांत, वरिष्ठ लिपिक आणि एक बडतर्फ कनिष्ठ लिपिक यांच्या संगनमताने केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट (Crime News) झाले आहे.
बनावट कागदपत्रांवर 31 जणांची भरती
छत्रपती संभाजीनगरसह नांदेड, जालना आणि लातूर येथील सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग विभागांमध्ये 2015 ते 2025 या काळात शिपाई, चौकीदार, सफाई कर्मचारी यांसारख्या पदांवर तब्बल 31 जणांची भरती (Shocking News) करण्यात आली होती. मात्र या भरती प्रक्रियेचा कोणताही अधिकृत पुरावा विभागाकडे नसल्याचं समोर आलं. या सर्व नियुक्त्या वरिष्ठ लिपिक अंकुश श्रीरंग हिवाळे आणि बडतर्फ कनिष्ठ लिपिक उज्वला अनिल नरवडे यांच्या संगनमताने झाल्याचा आरोप आहे. त्यांनी कार्यकारी अभियंत्यांच्या स्कॅन केलेल्या सह्यांचा वापर करून बनावट नियुक्तीपत्र तयार केली आणि त्याद्वारे उमेदवारांना शासकीय सेवेत रुजू करून घेतले.
देशाच्या नव्या उपराष्ट्रपतींचं नाव ठरलं? दिल्लीत राजकीय हालचालींना वेग, भेटीगाठी अन् बैठकांना उधाण
मोठा आर्थिक व्यवहार
याप्रकरणात आर्थिक उलाढालीचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर बनावट भरती करताना उमेदवारांकडून लाखो रुपयांची लाच घेतली गेल्याचा आरोप चौकशीतून समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर 15 मे 2025 रोजी तत्कालीन कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांच्या आदेशाने एस. बी. बिहारे यांच्या अध्यक्षतेखाली एक सहा सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली. समितीने सर्व नियुक्त्यांची नस्ती आणि मूळ फाईल्स तपासण्यासाठी वरिष्ठ लिपिक हिवाळे यांना कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी ती फाईल न देता कार्यालयातील कपाट बंद ठेवले.
मोदी-शहांनी निर्माण केलेली ‘विंचवांची शेती’; ठाकरेंचं मुखपत्र निवडणूक आयोगावर भडकलं
कपाटातून नस्ती गायब, घोटाळा उघड
कपाटाचे कुलूप पंचनामा करून उघडण्यात आले असता, संबंधित भरती प्रक्रियेची नस्तीच गायब असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे चौकशी समितीच्या संशयाला दुजोरा मिळाला आणि या बनावट भरती प्रकरणाचा पूर्णतः पर्दाफाश झाला. या संपूर्ण प्रकरणी कार्यकारी अभियंता शेषराव काशीनाथ चव्हाण यांनी वेदांतनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार हिवाळे आणि नरवडे यांच्याविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रांची निर्मिती आणि शासकीय यंत्रणेला गाफील ठेवण्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या प्रकरणामुळे शासकीय यंत्रणांच्या भरती प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विभागाच्या निष्काळजीपणामुळे आणि काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांच्या लबाडीमुळे 31 जण बेकायदेशीरपणे सरकारी सेवेत रुजू झाले. आता या सर्व भरती रद्द होण्याची शक्यता असून दोषींवर कठोर कारवाई केली जाण्याची मागणी जोर धरू लागली आहे.