दिवाळीच्या तोंडावरच महागाईचा भडका; 42 पैकी 41 दैनंदिन वस्तुंच्या किमतीत झाली वाढ

देशात महागाईचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसत असून वर्षभरात 42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत.

News Photo   2026 10 13T144435.442

Essential Commodities Price Hike

Essential Commodities Price Hike : देशात जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या (India) किंमतींमुळे सर्वसामान्यांचं घरगुती बजेट कोलमडलं आहे. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या 42 प्रमुख वस्तुंपैकी 41 वस्तुंचे दर गेल्या वर्षभरात वाढल्याचं सरकारी आकडेवारीतून समोर आलं आहे. यामध्ये कांद्याच्या किंमतीत सर्वाधिक 113 टक्क्यांची वाढ झाली असून साखर आणि खाद्यतेलाचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. केवळ बटाट्याच्या किंमतीत घट झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर 5.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षांतील हा उच्चांक असल्याचं आकडेवारीतून दिसतं. अन्नपदार्थांच्या वाढत्या किंमतींचा या महागाईत मोठा वाटा आहे. सप्टेंबरमध्ये अन्नधान्य महागाईचा वार्षिक दर 7.74 टक्के नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे रोजच्या जेवणासाठी लागणाऱ्या वस्तु खरेदी करताना ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

डाळींच्या किंमतीतही वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खर्चात भर पडली आहे. तूरडाळीचा सरासरी किरकोळ दर वर्षभरापूर्वी प्रतिकिलो 113 रुपये होता, तो आता सुमारे 129 रुपयांवर पोहोचला आहे. देशातील प्रमुख चार महानगरांमध्ये तूरडाळीचे दर प्रतिकिलो 140 ते 145 रुपयांदरम्यान आहेत. चणाडाळीच्या किंमतीतही 6.4 टक्क्यांची वाढ झाली असून तिचा दर 85 रुपयांवरून 91 रुपये प्रतिकिलो झाला आहे. डाळींच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य कुटुंबांना महिन्याचं बजेट सांभाळणं कठीण होत आहे.

खाद्यतेलाच्या बाजारातही दरवाढ कायम आहे. सूर्यफूल तेलाचा सरासरी किरकोळ दर प्रतिलिटर 191 रुपयांवर पोहोचला असून वर्षभरात त्यात सुमारे 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. पाम तेलाच्या किंमती 15.2 टक्क्यांनी, तर सोयाबीन तेलाच्या किंमती 14.6 टक्क्यांनी वाढल्या आहेत. मोहरीच्या तेलाचा दरही प्रतिलिटर 188 रुपयांवरून 204 रुपयांपर्यंत गेला आहे. तेलाच्या किंमती वाढल्याने स्वयंपाकाचा खर्च वाढत असून त्याचा थेट परिणाम घरगुती बजेटवर होत आहे.

UPI पेमेंटवर शुल्क लागू होण्याची तारीख बदलली; दिवाळीनंतरच MDR लागू होणार, NPCI ची घोषणा

तांदूळ आणि साखरेच्या दरातही वर्षभरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. सामान्य तांदळाचा सरासरी दर सुमारे 12 टक्क्यांनी वाढून प्रतिकिलो 47 रुपयांवर पोहोचला आहे. गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किंमतीत तुलनेनं कमी वाढ झाली आहे. साखरेचा दर एका महिन्यापूर्वी प्रतिकिलो सुमारे 59 रुपये होता, तो आता 56 रुपयांवर आला आहे. मात्र, वर्षभरापूर्वीच्या तुलनेत साखर अजूनही सुमारे 22 टक्क्यांनी महाग आहे. त्यामुळे महिन्याच्या किराणा खर्चात ग्राहकांना अधिक रक्कम खर्च करावी लागत आहे.

भाजीपाल्याच्या बाजारात कांद्याच्या दरवाढीने सर्वाधिक चिंता वाढवली आहे. कांद्याचा सरासरी दर प्रतिकिलो 53 रुपयांवर पोहोचला असून वर्षभरात किंमतीत जवळपास 113 टक्क्यांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, बटाट्याच्या दरात 6 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. टोमॅटोचा दरही वाढला असून 12 ऑक्टोबर रोजी तो प्रतिकिलो 42 रुपये होता. वर्षभरापूर्वी टोमॅटोचा दर 36 रुपये होता. त्यामुळे कांदा आणि टोमॅटोच्या खरेदीसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

कांद्याच्या दरवाढीमागे महाराष्ट्रातील खरीप कांद्याच्या उत्पादनातील घट हे प्रमुख कारण असल्याचं व्यापारी क्षेत्रातील सूत्रांचं म्हणणं आहे. देशात सर्वाधिक कांदा उत्पादन महाराष्ट्रात होतं. यंदा खरीप कांद्याच्या उत्पादनात अंदाजे 5 ते 7 टक्क्यांची घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. लागवडीखालील क्षेत्र कमी होणं आणि मान्सूनच्या पावसाला झालेला विलंब यामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील उत्पादन घटल्यास बाजारातील कांद्याचा पुरवठा कमी होऊन दर आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान, खरीप हंगामातील नवीन कांदा बाजारात दाखल झाल्यानंतर किंमती कमी होतील, अशी अपेक्षा सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे. डाळींच्या वाढत्या दरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार राखीव साठ्यातील हरभरा बाजारात आणण्याचाही विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, कांदा, खाद्यतेल, साखर आणि डाळींच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. आगामी काळात बाजारातील पुरवठा वाढतो का आणि त्यामुळे दर कमी होतात का, याकडे ग्राहकांचं लक्ष लागलं आहे.

Exit mobile version