Pahalgam Terror Attack : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात २६ जणांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. (Attack) त्यातच काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदल प्रमुख, संरक्षणमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यावर पूर्णपणे विश्वास दाखवला. तसंच, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तुम्ही वेळ ठरवा, टार्गेट ठरवा असे निर्देशही दिले आहेत. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणं हा राष्ट्रीय संकल्प आहे, असं मोदींनी या बैठकीत सांगितलं. भारताच्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. या बैठकीनंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले असून पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी मध्यरात्री दीड वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी पाकिस्तानकडून भारताबद्दल एक नवा दावा करण्यात आला.
काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळे बंद, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोठा निर्णय
पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भारताबद्दल नवा दावा केला आहे. यावेळी त्यांनी दावा केला आहे की, भारत पहलगाम हल्ल्याच्या घटनेचा खोटा बहाणा करुन येत्या २४ किंवा ३६ तासात लष्करी हल्ला करु शकतो, अशी विश्वसनीय गुप्त माहिती समोर आली आहे. जर भारताने अशाप्रकारे कारवाई केली तर आम्ही त्या कारवाईला आक्रमकरित्या प्रत्युत्तर देऊ, असे अताउल्लाह तरार यांनी म्हटले आहे.
“पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी ठरला आहे. या संकटाची वेदना आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. जगामध्ये आम्ही नेहमीच याचा निषेध केला आहे. सत्य शोधण्यासाठी तज्ञांच्या एका निष्पक्ष आयोगामार्फत विश्वसनीय, पारदर्शक आणि स्वतंत्र चौकशी करण्याची तयारी पाकिस्तानने दर्शवली आहे. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे कोणत्याही किंमतीत संरक्षण करण्याच्या संकल्पाचा मी इथे पुनरुच्चार करतो. तसेच कोणत्याही आक्रमक कारवाईला निर्णायक प्रत्युत्तर दिलं जाईल, असं पाकिस्तानचे माहिती मंत्री यांनी म्हटलं आहे.