मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) निर्बंध आणलेल्या ‘पेटीएम’ ने आपली युपीआय सेवा सुरु ठेवण्यासाठी अॅक्सिस बँकेसोबत (Axis Bank) करार केला आहे. पेटीएम (Paytm) आणि अॅक्सिस बँक या आठवड्यात थर्ड पार्टी अॅप्लिकेशन प्रोव्हायडर होण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे (एनपीसीआय) अर्ज करणार आहेत. या अर्जाला मान्यता मिळाल्यास पेटीएम आपली यूपीआय सेवा सुरू ठेवू शकणार आहे. त्यामुळे पेटीएमसाठी आता अॅक्सिस बँक तारणहार ठरण्याची शक्यता आहे. (Paytm has tied up with Axis Bank to continue its UPI service.)
नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 31 जानेवारी रोजी पेटीएम पेमेंट्स बँकेवर (Paytm Crisis) निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांनुसार फास्टॅग, वॉलेट आणि बँक खात्यात (Paytm Banking Service) पैसे जमा करण्यावरही बंदी असणार आहे. आधी 29 फेब्रुवारीपासून हे निर्बंध असतील असे सांगितले होते. मात्र त्यानंतर याची मुदत 15 मार्चपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे 15 मार्चनंतर पेटीएमवरुन कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. पेटीएमची युपीआय सेवाही बंद होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर आता पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशनने दिलेल्या माहितीनुसार, पेटीएमने युपीआय सेवांसाठी अॅक्सिस बँकेसोबत भागीदारी केली आहे. मागील काही दिवसांपासून याबाब एनपीसीआयकडे पत्रव्यवहार सुरु आहेत. आता या आठवड्यात थर्ड पार्टी अॅप्लिकेशन प्रोव्हायडर होण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे (एनपीसीआय) अर्ज करणार आहोत. त्यामुळे पेटीएमसाठी आता अॅक्सिस बँक तारणहार ठरण्याची शक्यता आहे.
पेटीएम पेमेंट्स बँकेवरील कारवाईचा आढावा घेण्यास RBI चा नकार
सध्या, पेटीएमसाठी सर्वच बाजूंनी अडचणींचा काळ असल्याचे दिसते आहे. आधीच रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. त्यानंतर पेटीएमच्या शेअर्समध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली. याशिवाय रिझर्व्ह बँकेने सोमवारी पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध कोणत्याही कारवाईचा आढावा घेण्यास नकार दिला. त्यामुळे आरबीआय आपल्या निर्णयावर पुनर्विचार करेल आणि फिनटेक कंपनीला काहीसा दिलासा मिळेल ही पेटीएमची आशाही संपुष्टात आली.
1 पॅन कार्डवर 1000 बँक खाती
रॉयटर्सच्या अहवालानुसार, आरबीआयने बंदी लादण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पेटीएम पेमेंट्स बँकेमध्ये एका पॅन नंबरवर एक हजारहून अधिक वापरकर्त्यांचे खाते जोडलेले होते. एवढेच नाही तर ओळखपत्राविना कोट्यवधी रुपयांचे व्यवहारही केले होते, त्यामुळे मनी लाँड्रिंगची भीती निर्माण झाली आहे. RBI आणि ऑडिटर्स या दोघांनीही केलेल्या तपासणीत पेटीएम बँक नियमांचे पालन करत नसल्याचे आढळून आले आहे.