Petrol Diesel Price Hike : देशात दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या महागाईत आणखी एक मोठा धक्का भारतीयांना बसला आहे. भारतात आजपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर 3.14 आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 3.11 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून पेट्रोलचा दर प्रति लिटर 97.77 आणि डिझेलचा दर प्रति लिटर 93.67 झाला आहे. तेल कंपन्यांनी मध्यरात्रीच ईमेल पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमधील या वाढीची घोषणा केली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार होत असल्याने आणि भारतीय रुपयाचे मूल्या कमकुवत होत असल्याने देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. जेव्हापासून मध्यपूर्वेमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात संघर्ष उफाळून आला, तेव्हापासूनच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती.
अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई; उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, महसूल विभागात खळबळ
रविवार आणि सोमवारी, पंतप्रधान मोदींनी जनतेला पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन करून, इंधनाच्या किमती वाढणार असल्याचे संकेत दिले होते. या आवाहनानंतर दोन दिवसांनी म्हणजेच आज, 15 मे रोजी 2022 नंतर पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली प्रचंड वाढ आणि ‘अंडर-रिकव्हरीज’ (इंधन विक्री करताना उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळाल्यामुळे होणारा तोटा) यामुळे तेल विपणन कंपन्यांना (OMCs) तोटा सहन करावा लागत आहे. या कंपन्यांना सध्या दररोज सुमारे 1000 कोटींचा तोटा होत आहे. या ‘अंडर-रिकव्हरीज’ची (तोट्याची) रक्कम जवळपास 1.98 लाख कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, तर केवळ एका तिमाहीतील तोटा सुमारे 1 लाख कोटी इतका आहे. तर दुसरीकडे 14 मे पासून मुंबईत सीएनजी प्रतिकिलो 2 रुपयांनी महाग झाला आहे.
