अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई; उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, महसूल विभागात खळबळ

भोंदू बाबा म्हणून ओळख निर्माण झालेल्या अशोक खरात प्रकरणात नाव समोर आल्यानंतर काही दिवसांपूर्वीच भांडे यांची बदली करण्यात आली होती.

  • Written By: Published:
Untitled Design 15 1

Deputy Collector Abhijeet Bhande suspended : महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणाऱ्या अशोक खरात प्रकरणात आता आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे यांना महसूल विभागाने निलंबित केले असून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. भोंदू बाबा म्हणून ओळख निर्माण झालेल्या अशोक खरात प्रकरणात नाव समोर आल्यानंतर काही दिवसांपूर्वीच भांडे यांची बदली करण्यात आली होती. मात्र आता या प्रकरणाने अधिक गंभीर वळण घेत थेट निलंबनापर्यंत मजल मारली आहे.

नाशिकमधील पाथर्डी शिवारातील सुमारे 40 गुंठे जमिनीच्या सातबाऱ्यावर अभिजित भांडे यांच्या पत्नीचे आई अशोक खरात यांच्या मुलीचे नाव एकत्र आढळल्याने प्रशासनात संशयाची ठिणगी पडली. यानंतर या व्यवहाराची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आणि अखेर महसूल विभागाने कठोर भूमिका घेत भांडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

अशोक खरात याच्यावर शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणामुळे आधीच अनेक राजकीय आणि प्रशासकीय व्यक्तींवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव देखील चर्चेत आले असून, त्यांची ईडीकडून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ इजा भोंदू बाबापुरते मर्यादित न राहता राजकारण, प्रशासन आणि आर्थिक व्यवहारांच्या गुंतागुंतीपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे.

पिंपरी-चिंचवड हादरलं! युवराज रेस्टॉरंटमध्ये धारदार शस्त्राने हल्ला करत आरपीआय नेते अनिल मोरे यांची हत्या

अभिजित भांडे यांचे अशोक खरात याच्याशी नेमके कोणते संबंध होते, याबाबत विविध आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत. खरात याच्या मुलीच्या आणि भांडे यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या जमिनीतील गुंतवणूक हा या चौकशीचा केंद्रबिंदू ठरला आहे. महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही व्यवहार सुलभ करण्यात आले होते का, याचा देखील तपास सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी काही महसूल अधिकारी किंवा प्रशासकीय कर्मचारी सहभागी आहेत का, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. अभिजित भांडे यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर महसूल विभागातील अनेक अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा प्रशासनात रंगली आहे. अशोक खराटशी संबंधित व्यवहार, जमीन खरेदी-विक्री, आर्थिक गुंतवणूक आणि शासकीय पातळीवरील मदत यांची आता नव्याने चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकीकडे महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप, दुसरीकडे जमीन व्यवहार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कथित संबंध, त्यामुळे अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचे आणि संवेदनशील बनताना दिसत आहे. आता या तपासातून आणखी कोणती नावे समोर येतात आणि प्रशासन पुढे कोणती कारवाई करते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

follow us