बंगळुरूत PM मोदींच्या सुरक्षेला धक्का? आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यक्रमस्थळापासून अवघ्या 3 किमीवर स्फोटके आढळल्याने अलर्ट

बंगळुरूच्या बाहेरील भागात, पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमस्थळाजवळ स्फोटक साहोटी आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Untitled Design 10

Untitled Design 10

PM Modi’s security lapses in Bengaluru : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या कर्नाटक दौऱ्यादरम्यान मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. बंगळुरूच्या बाहेरील भागात, पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमस्थळाजवळ स्फोटक साहोटी आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. मिळलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी नियमित सुरक्षा तपासणी सुरू असताना केन्गेरी-कनकापुरा मार्गावरील कागलीपुरा परिसरात एका आश्रमाबाहेर दोन जिलेटीनच्या कांड्या सापडल्या.

हे ठकाण मुख्य कार्यक्रमस्थळापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असल्याने सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. फुटपाथच्या कडेला संशयास्पद अवस्थेत हे स्फोटक साहित्य आढळल्यानंतर तात्काळ संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासह फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. परिसराची बारकाईने तपासणी करण्यात आली असून, कोणताही धोका टाळण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून, ही स्फोटके तेथे कशी पोहोचली याचा तपास सुरू आहे.

खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; खून कि आत्महत्या?

प्राथमिक चौकशीत या भागात सुरू असलेल्या खाणकामासाठी जिलेटीनच्या कांड्या आणल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तवली जात असली तरी, त्या मुद्दाम ठेवण्यात आल्या होत्या का याचा देखील तपास केला जात आहे. यामागे कोणता मोठा कट होता का, याचा देखील शोध सुरक्षा यंत्रणा घेत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू बाहेरील आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या आंतरराष्ट्रीय केंद्राला भेट दिली. संस्थेच्या 45 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. यावेळी अध्यात्मिक गुरु श्री श्री रवी शंकर यांच्या उपस्थितीत एका भव्य ध्यानगृहाचे उदघाटन करण्यात आले.

पंतप्रधानांच्या या दौऱ्यासाठी आधीच बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. मात्र स्फोटके सापडल्यानंतर सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली असून संपूर्ण परिसरावर कडक नजर ठेवली जात आहे.

Exit mobile version