PM Modi on Congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. काँग्रेसला मुस्लिमांचा एवढाच कळवळा असेल तर त्यांनी मुस्लिम व्यक्तीला आपल्या पक्षाचा राष्ट्रीय अद्यक्ष बनवावं. संसदेत मुस्लिमांना 50 टक्के तिकीट द्यावं. ते जिंकून आले तर त्यांचं म्हणणं मांडतील. पण काँग्रेसला तसं करायचंच नाहीये, असा हल्लाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Modi) यांनी चढवला आहे. हरियाणाच्या हिस्सारमध्ये मोदी बोलत होते. तसंच, वक्फ कायद्यामुळे काँग्रेसने संविधानाची ऐसीतैसी केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
बांग्लादेशला दणका! भारतातून जाणारा व्यापारी मार्ग बंद; मोदी सरकारचा आदेश काय?
कुणाचंही भलं करावं हे कधीच काँग्रेसला वाटलं नव्हतं. मुस्लिमांचं भलं करावं असंही त्यांना कधी वाटलं नाही. हेच काँग्रेसचं खरं वास्तव आहे. काँग्रेसच्या लांगुलचालनाच्या राजकारणाने मुस्लिमांना काडीचाही फायदा झाला नाही. उलट त्यांचं नुकसान झालं. काँग्रेसने केवळ काही कट्टरपंथियांना खुश करण्याचा पर्याय निवडला. इतर समाज हालअपेष्टेत राहिला. अशिक्षित राहिला. गरीब राहिला, असं सांगतानाच काँग्रेसच्या कुनितीचं सर्वात मोठं उदाहरण वक्फ कायदा आहे. नव्या तरतुदींमुळे वक्फच्या पवित्र भावनेचा सन्मान होणार आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले आहेत.
गरीबांना फायदा होईल
वक्फच्या नावावर लाखो हेक्टर जमीन आहे. वक्फच्या मालमत्तेचा लाभ गरजवंतांना दिला असता तर त्यांना फायदा झाला असता. पण, या मालमत्तेचा फायदा भू-माफियांना मिळाला. आता या नव्या दुरुस्ती विधेयकामुळे गरीबांची लूट बंद होणार आहे, असा दावा मोदींनी केला. आता नव्या वक्फ कायद्यामुळे देशातील कानाकोपऱ्याती आदिवासींच्या कोणत्याही जमिनीला ते हात लावू शकणार नाहीत. नव्या तरतुदींमुळे मुस्लिम समाजातील गरीब आणि पसमांदा कुटुंब, महिला आणि खासकरून मुस्लिम विधवा, मुलांना हक्क मिळेल. त्यांचे हक्क सुरक्षित राहतील. हाच खरा न्याय आहे, असंही ते म्हणाले.
बाबासाहेबांना अपमानित केलं
बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाचं स्वप्न पाहिलं होतं. संविधानात त्यांनी सामाजिक न्यायाची व्यवस्था केली होती. त्यातही खंजीर खुपसून काँग्रेसने संविधानाच्या या तरतुदींना लांगूलचालणाचं माध्यम बनवलं. सत्ता हस्तगत करण्याचं एक हत्यार म्हणून काँग्रेसने संविधानाचा वापर केला. जेव्हा जेव्हा काँग्रेसला सत्तेचं संकट दिसलं तेव्हा तेव्हा त्यांनी संविधान पायदळी तुडवलं. काँग्रेसने आणीबाणीच्या काळात संविधानाच्या आत्म्याला नख लावलं. आपल्याच हाती सत्ता राहावी म्हणून त्यांनी हे केलं. काँग्रेसने बाबासाहेबांना सतत अपमानित केलं. त्यांचे विचार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला.