BJP-JDS Alliance: 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातून भाजपला मोठा जोडीदार मिळाला आहे. जेडीएसने कर्नाटकमध्ये भाजपसोबत युती करण्याची घोषणा केली आहे. जेडीएस नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी शुक्रवारी जाहीर केले की त्यांचा पक्ष राज्यात काँग्रेसविरोधात भाजपसोबत काम करेल. गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही पक्षांच्या ऐक्याबाबत चर्चा सुरू होती.
मात्र आता एचडी कुमारस्वामी यांनी भाजपशी युती करणार असल्याची घोषणा केली आहे. सध्या कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे. तिथं भाजप हा दुसरा पक्ष आणि जेडीएस तिसऱ्या क्रमांकावरचा पक्ष आहे. आता कर्नाटकमध्ये भाजप आणि जेडीएस एकत्रितपणे काँग्रेस सरकारविरोधात लढणार आहेत.
माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची घोषणा
युतीची घोषणा करताना, जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी म्हणाले की त्यांच्या पक्षाने राज्याच्या हितासाठी भाजपसोबत एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. कुमारस्वामी पुढे म्हणाले की पक्षाचे सुप्रीमो आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी त्यांना पक्षाबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.
Manipur violence : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची हकालपट्टी करा, भाजपच्या मित्रपक्षांची मागणी
कुमारस्वामी म्हणाले की, युतीबाबत बोलायला अजून वेळ आहे. भाजप आणि जेडीएस हे दोन्ही विरोधी पक्ष आहेत, त्यामुळे राज्याच्या हितासाठी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-जेडीएसची ही युती एकत्र राहील की नाही, याबाबत अजूनही साशंकता आहे. सध्या राज्यात दोन्ही पक्ष विरोधी आघाडीच्या भूमिकेत एकत्र दिसणार आहेत.