Post Office Time Deposit Scheme: सध्या बँकांमध्ये ठेवीवर कमी व्याज मिळत आहेत. ठेवीवरील व्याजदर दिवसेंदिवस कमी होत आहे. तुम्हाला बँकांपेक्षा पोस्ट ऑफिसमधील ठेवीमधून जास्त व्याज मिळू शकते. पोस्ट ऑफिसच्या विविध योजना आकर्षक परताव्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरतायत. तुम्हीही तुमच्या कमाईतील काही रक्कम सुरक्षित ठिकाणी गुंतवून चांगला परतावा मिळवू शकतात. पोस्ट ऑफिसची बचत योजना, टाइम डिपॉझिट योजना म्हणजेच मुदत ठेव ( (Post Office Time Deposit Scheme) योजनेवर आकर्षक व्याज मिळतंय. ज्यामध्ये एकदाच गुंतवणूक करून केवळ व्याजातूनच 90 हजार ते 5 लाख रुपयांहून अधिक कमाई करता येऊ शकते.
पोस्ट ऑफिसच्या सर्व योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीची हमी केंद्र सरकार देते. त्यामुळे गुंतवलेले पैसे बुडण्याचा धोका जवळपास नसतो. पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग्ज योजनांमध्ये सुरक्षिततेसोबतच चांगला परतावाही मिळतो. पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेत सध्या कमाल 7.5 टक्के वार्षिक व्याजदर आहे. ही एक वन-टाइम इन्व्हेस्टमेंट योजना आहे. गुंतवणुकीच्या कालावधीनुसार व्याजदर निश्चित केला जातो. या योजनेत ठेवीदार गरजेनुसार ठेवीचे वर्ष निवडतो.
किती वर्षाला किती व्याज मिळते ?
1 वर्षाच्या ठेवीवर 6.9 टक्के, दोन वर्षांच्या ठेवीवर 7 टक्के, तीन वर्षांसाठी 7.1 टक्के, पाच वर्षांसाठी 7.5 टक्के व्याज मिळते. समजा सागरने पाच वर्षांसाठी एक लाख रुपये गुंतविले तर पाच वर्षांनी 1 लाख 44 हजार 995 रुपये मिळतील. म्हणजेच 44 हजार 995 निव्वळ व्याज मिळेल. तर पाच वर्षांसाठी दोन लाख रुपये गुंतविले, तर 2 लाख 89 हजार 990 रुपये मिळतील म्हणजेच निव्वळ व्याज 89 हजार 990 रुपये मिळणार आहे. परंतु हेच पैसे तुम्ही बँकेत एफडी म्हणून सात टक्के वार्षिक व्याजदराने ठेवल्यास 2 लाख 82 हजार 956 रुपये मिळतील. म्हणजे पोस्टापेक्षा 7 हजार 34 रुपये कमी मिळतील.
फक्त व्याजातून 5 लाखांहून अधिक कमाई कशी ?
या योजनेत जर तुम्ही 12 लाख रुपयांची एकरकमी रक्कम 5 वर्षांसाठी ठेवली तर 7.5 टक्के वार्षिक व्याजदरानुसार तुम्हाला 17 लाख 39 हजार 938 रुपये मिळतील. म्हणजेच व्याजातून 5 लाख 39 हजार 938 रुपये मिळू शकतात.
कमी कालावधीत किती रक्कम मिळेल ?
जर तुमचे उद्दिष्ट कमी कालावधीत चांगला परतावा मिळवण्याचे असेल, तर 10 लाख रुपयांची गुंतवणूक 3 वर्षांसाठी केल्यास 7.1 टक्के व्याजदरानुसार मुदतीनंतर 12 लाख 35 हजार 75 रुपये मिळतील. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजनेत आकर्षक व्याजासोबतच आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत करसवलचीही लाभ मिळते.
किती रक्कम गुंतवू शकता ?
किमान 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. सिंगल किंवा जॉइंट अकाउंट उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे. कमाल गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही, त्यामुळे इच्छेनुसार कितीही रक्कम गुंतवता येते.
