Download App

‘गंगेतून मथुराकरांना पेयजल’म्हणणाऱ्या हेमा मालिनीला तोंडावर पाडलं; ट्रोलर्सनी सुनावलंच!

मथुराकरांना गंगेचं पेयजल दिलं म्हणणाऱ्या भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांना सोशल मीडियावर तुफान ट्रोल केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

Hema Malini Speak On Ganga River Water : नमामि गंगे योजनेंतर्गत गंगा नदीच्या पाण्याच्या शुद्धीकरणाचं काम मोदी सरकारकडून हाती घेण्यात आलं आहे. नदीच्या पाण्याच्या शुद्धीकरणाचं काम सुरु असतानाच भाजपच्या खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांनी गंगेतून मथुराकरांना पेयजल आम्ही दिलं असल्याचा दावा केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हेमा मालिनी यांनी हा दावा केलायं खरा मात्र, ट्रोलर्सकडून हेमा मालिनी यांच्यावर निशाणा साधत मथुरेतून गंगा वाहतच नसल्याचं म्हणत तोंडावरच पाडलं असल्याचं दिसून येत आहे. फक्त ट्रोलर्सच नाहीतर अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनीही हेमा मालिनीच्या दाव्यावर सडेतोडपणे भाष्य करीत अशिक्षित, दृष्टीहीन, खोटं बोलणाऱ्या खासदारांना खाली खेचण्याची वेळी आली असल्याचं म्हणत जोरदार टीका केली आहे. सध्या हेमा मालिनीच्या या दाव्याची आणि ट्रोलर्सच्या कमेंट्सचीच समाजमाध्यमांवर तुफान चर्चा सुरु झाली आहे.

मागील पाच वर्षात केलेल्या विकासकामांबद्दल बोलताना हेमा मालिनी यांनी म्हणाल्या, “मी या क्षेत्रातील नसून एक कलाकार आहे. मला खूप समाधान वाटतं की, मी माझ्या मतदारसंघात कामे केली आहेत. माझ्याकडून विकासकामे झाल्याचा मला अभिमान वाटतोयं. या मतदारसंघात पाण्याची मोठी समस्या होती, लोकांना खारं पाणी मिळत होतं, मात्र, मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पाण्याची समस्या सोडवली. त्यामुळे आता लोकं समाधानी आहेत. आम्ही गंगा नदीचं शुद्धीकरण केलं. मथुरेच्या मांटमध्ये एका मोठा प्रकल्प उभारला असून आम्ही गंगेचं पाणी पाईपलाईनद्वारे मथुरेतील लोकांना पिण्याचं पाणी मिळत असल्याचा दावा हेमा मालिनी केला आहे.

ट्रोलर्सनी हेमा मालिनीचा दावा हाणून पाडला :
हेमा मालिनी यांनी केलेला दावा ट्रोलर्सनी हाणून पाडला आहे. हेमा मालिनी यांच्या दाव्याचा हा समाजमाध्यमांवर येताच एक ट्रोलर म्हणतोयं की, ‘मग तुम्ही निवडणूक लढवून उत्कृष्ट संसदपटू का बनत नाही?’, तर दुसऱ्या ट्रोलर्सने हेमा मालिनी यांची थेट ग्रेडच सांगत सडकून टीका केली आहे. टोलर्स म्हणाला, ‘एक सी ग्रेडची अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अजेंड्यासाठी चुकीचं तत्वज्ञान सांगत असल्याची टीका केली आहे. तर लावण्या बलाल जैन नामक महिलेने थेट मॅडम गंगा नदी तुमच्या मतदारसंघातून वाहतच नसल्याचं म्हणत दावा हाणून पाडला आहे.

अशिक्षित…खासदाराला खाली खेचण्याची वेळ : प्रकाश राज
मालिनी यांच्या दाव्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडत असतानाच अभिनेते प्रकाश राज यांनीही एका महिलेचं ट्विट शेअर करीत मालिनी या अशिक्षित, खोटं बोलणाऱ्या, विनोद करणाऱ्या सर्वोच्च खासदार असून त्यांना खाली खेचण्याची वेळी आली असल्याचं म्हटलं आहे.

तर दुसरीकडे हेमाल मालिनी यांच्या दाव्याचं काही नेटकऱ्यांकडून समर्थनही करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. समर्थनकर्त्यांने ट्रोलर्सचा ‘डफर’ असा उल्लेख करीत हेमा मालिनी स्वच्छ मनाने प्रभावीपणे एक कार्यकक्षम खासदार म्हणून काम करीत असल्याचं म्हणत हेमा मालिनी यांना समर्थन दिलं आहे. तसेच नमामि गंगे योजनेच्या माध्यमातून गोकुल बैराजमधून गंगेच्या पाण्याचा शुभारंभ करण्यात आला असून या योजनेतून घरोघरी गंगेच पाणी पोहचत असल्याचं भाजपचे कार्यकर्ते राहुल कौशिक यांनी सांगितलं आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवर मालिनी यांच्या दाव्यावर संमिश्र कमेंट्स दिल्या जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील मथुरा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून हेमा मालिनी तर बहुजन समाज पार्टीकडून सुरेश सिंह तर इंडिया आघाडीकडून मुकेश धनगर मैदानात उतरले आहेत. त्यामुळे यंदा मथुरेत तिरंगी लढत होणार आहे. येत्या 26 एप्रिल रोजी मथुरेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यातच आता अशा पद्धतीने
भाजपच्या उमेदवार हेमा मालिनी ट्रोल होत असल्याने त्याचा परिणामा मतदानावर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

follow us