Pm Modi On Mission South : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी आज (दि.8) चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Chennai International Airport) 1 हजार 260 कोटी रुपये खर्चून पूर्ण झालेल्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे (फेज-1) उद्घाटन केले. राज्याची समृद्ध संस्कृती आणि वारसा दाखवण्यासाठी एकात्मिक इमारतीची विशेष रचना करण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया(Jyotiraditya Scindia), तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी (Tamil Nadu Governor R.N. Ravi)आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin)यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींनी चेन्नई-कोइम्बतूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी चेन्नईमध्ये रोड शो देखील केला. यापूर्वी पीएम मोदी तेलंगणाच्या दौऱ्यावरही गेले होते. पंतप्रधानांनी येथील सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले आहे. याशिवाय अनेक पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचे लोकार्पन केले.
यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी कोणाचेही नाव न घेता जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले की, काही मूठभर लोक घराणेशाहीला प्रोत्साहन देत आहेत. ते तेलंगणातील लोकांसाठी सुरू केलेल्या प्रकल्पांचे फायदे कसे मिळवू शकतात? याची शक्यता शोधत आहेत. केंद्राच्या राज्यातील योजनांबाबत सत्ताधारी पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप केला. त्याचवेळी असहकाराबद्दल त्यांनी दु:खही व्यक्त केले.
यावेळी पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवरही जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून त्या पक्षांना दणका दिला आहे, अशी टीका यावेळी पंतप्रधान मोदींनी केली आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 14 राजकीय पक्षांनी नुकतीच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये विरोधी पक्षनेते आणि इतर नागरिकांविरुद्ध त्यांच्या मतभेदाचा मूलभूत अधिकार वापरल्याबद्दल कठोर गुन्हेगारी खटल्यांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला आहे.