SEBI Chief Madhabi Puri Buch : हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालातील आरोपांनंतर पहिल्यांदा चर्चेत आलेल्या सेबी प्रमुख माधवी पुरी बूच (Madhavi Puri Buch) यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. आता माधवी पुरी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. संसदेच्या लोकलेखा समितीने (PAC) त्यांना समन्स बजावलं आहे. येत्या २४ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश या समन्सद्वारे देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त सेबीचे अन्य अधिकारी आणि अर्थ मंत्रालयाच्या काही अधिकाऱ्यांना चौकशी दरम्यान हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
सेबी प्रमुख माधबी पुरी आणखी गोत्यात; नव्या अहवालामुळे का उडाली खळबळ..
संसदेच्या लोकलेखा समितीने (PAC) सेबी (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) कारभाराचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातच समन्स पाठवण्यात आले आहे. आता माधवी पुरी यांना समितीसमोर हजर राहावे लागणार आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
याआधी हिंडनबर्ग कंपनीने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. यामध्ये माधबी पुरी बूच यांचे अदानी समुहाशी संबंध असल्याचे अनेक आरोप करण्यात आले होते. मागील वर्षीही हिंडनबर्गचा अहवाल आला होता. या अहवालाचा मोठा झटका अदानी उद्योग समुहाला बसला होता. अदानींच्या विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती.
या आरोपांनंतर माधवी पुरी आणि त्यांचे पती धवल बुच यांनी एक निवेदन प्रसिद्धी दिलं होतं. हिंडेनबर्गच्या अहवालात जी गुंतवणूक सांगण्यात आली आहे ती 2015 मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी आम्ही सिंगापूरमध्ये खासगी नोकरी करत होतो. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी पूर्णवेळ सदस्य म्हणून माधवी पुरी सेबीत रुजू झाल्या होत्या अशी माहिती या निवेदनात देण्यात आली होती.
बुच यांनी सांगितले की कन्सल्टन्सी संस्थांची माहिती सेबीला दिली होती. त्यांच्या पतीने 2019 मध्ये सेवा निवृत्त झाल्यानंतर स्वतःच्या कन्सल्टिंग व्यवसायासाठी या संस्थांचा वापर केला होता. हिंडनबर्गने सिंगापूर कंपनीच्या रेकॉर्डचा हवाला देत स्पष्ट केले की मार्च 2022 मध्ये अगोरा पार्टनर्समधील सर्व शेअर्स माधबी पुरी बुच यांनी त्यांच्या पतीला ट्रान्सफर केले होते.