Download App

‘आप’ आमदाराचा गोळी लागून गूढ मृत्यू; घरात असताना गोळी झाडल्याचा आवाज

लुधियाना पश्चिम मतदारसंघातील आम आदमी पार्टीचे आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांचा काल रात्री बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला.

AAP MLA Death : पंजाब राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील लुधियाना पश्चिम मतदारसंघातील आम आदमी पार्टीचे आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांचा काल रात्री बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना डीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, येथे त्यांचा मृत्यू झाला. आमदार गोगी एका समारंभातून घरी येऊन त्यांच्या खोलीत जेवण करत होते. याच दरम्यान गोळीबाराचा आवाज ऐकू आला. त्यांची पत्नी खोलीत आली त्यावेळी आमदार गोगी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

पंजाबमध्ये भीषण अपघात, बस नाल्यात पडली, 8 जणांचा मृत्यू; 21 जखमी

घटनेची माहिती मिळताच लुधियाना कमिश्नरेटचे पोलीस कमिश्नर कुलदीप चाहल डीएमसी रुग्णालयात दाखल झाले. डीसीपी शुभम अग्रवाल, एडीसीपी रमनदीप भुल्लर, एसीपी अकर्शी जैन सुद्धा येथे दाखल झाले. गोळी कशामुळे आणि कुणी झाडली याची खात्रीशीर माहिती अजून तरी मिळालेली नाही. परंतु, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आमदार गोगी त्यांच्याकडील पिस्तूल साफ करत होते. त्याचवेळी अचानक गोळी झाडली गेली. यानंतर पोलिसांनी लागलीच घटनेचा तपास सुरू केला आहे.

गुरप्रीत गोगी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसमधून आपमध्ये सहभागी झाले होते. आपने त्यांना लुधियाना पश्चिममधून तिकीट दिले. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. आपमध्ये येण्याआधी गोगी 23 वर्षे काँग्रेसमध्ये होते. काँग्रेस सरकारच्या काळात गोगी पंजाब स्मॉल इंडस्ट्रीज अँड एक्सपोर्ट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष राहिले आहेत.

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरप्रीत गोगी स्कूटरवरून पोहोचले होते. या प्रसंगाची पंजाबच्या राजकारणात चांगलीच चर्चा झाली होती. पंजाब विधानसभा निवडणुकीत गुरप्रीत गोगी यांना जवळपास 40 हजार मते मिळाली होती.

VIDEO : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर गोळीबार, अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील धक्कादायक घटना

follow us