Punjab Police officer on FBI’s radar : खाकीचा काळा चेहरा… पंजाबच्या SHO चा ‘इंटरनॅशनल’ भ्रष्टाचार; FBI च्या रडारवर 3.5 कोटींची वसुली… पंजाब पोलिसांच्या खाकीवर एक असा डाग लागला आहे, ज्याची चर्चा आता थेट अमेरिकेपर्यंत पोहोचलीय. होशियारपूर जिल्ह्यातील टांडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन SHO गुरिंदरजीत सिंह नागरा सध्या FBI च्या रडारवर आहेत. आरोप असा आहे की, या पोलीस अधिकाऱ्याने ‘चोर’ आणि ‘पोलीस’ यांच्यातील रेषा पुसून टाकली आणि चक्क एका आंतरराष्ट्रीय गँगस्टरच्या साथीने अमेरिकेतील एका भारतीय कुटुंबाला लुटले.
काय आहे हे प्रकरण? : FBI ने ‘ऑपरेशन हार्डबॉल’ नावाचे एक मोठे आंतरराष्ट्रीय अभियान राबवले आहे. या मोहिमेचा उद्देश जग्गू भगवानपुरियासारख्या ट्रान्सनॅशनल क्राईम सिंडिकेटचा पर्दाफाश करणे हा आहे. याच तपासात समोर आले की, पंजाबमधील भ्रष्ट पोलीस अधिकारी आणि गँगस्टर्सचे एक नेटवर्क कार्यरत आहे. या नेटवर्कने अमेरिकेत स्थायिक झालेल्या एका भारतीय कुटुंबाला हेरले आणि त्यांना भारतात खोट्या हत्या प्रकरणात गोवण्याची धमकी दिली.
3.5 कोटींची वसूली : लॉस एंजिल्सच्या फेडरल कोर्टात दाखल चार्जशीटनुसार, SHO गुरिंदरजीत सिंह नागरा यांनी या कुटुंबाला थेट धमकी दिली होती. जर 4 लाख डॉलर (सुमारे 3.5 कोटी रुपये) दिले नाहीत, तर कुटुंबातील तीन सदस्यांना खोट्या मर्डर केसमध्ये तुरुंगात टाकले जाईल. स्वतः पोलीस अधिकारी असूनही, त्यांनी गँगस्टर जग्गू भगवानपुरियाच्या सिंडिकेटसोबत हातमिळवणी केली आणि वसुलीचा हा ‘काळा धंदा’ केला.
जेव्हा रक्षकच बनला भक्षक : पंजाबमध्ये एक म्हण आहे ‘चोर नाल कुत्ती रली’ (जेव्हा राखण करणाराच चोरट्यांशी मिळतो). हे प्रकरण या म्हणीचा जिवंत पुरावा ठरले आहे. अमेरिकन प्रॉसिक्यूटर्सच्या म्हणण्यानुसार, हा केवळ एक अधिकारी भ्रष्ट नव्हता, तर त्याने भारतीय तपास यंत्रणांचा आणि कायद्याचा वापर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर खंडणी वसूल केली.
शरद पवारांच्या पक्षात सर्व काही आलबेल नाही? 5 ते 6 खासदार अस्वस्थ असल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
पंजाब पोलिसांची धावपळ : ही बातमी आणि FBI चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पंजाब पोलीस विभागात खळबळ उडाली. घाईघाईने SHO गुरिंदरजीत सिंह नागरा यांना टांडा पोलीस ठाण्यातून हटवून पोलीस लाईनमध्ये पाठवण्यात आले. जालंधर रेंजच्या DIG ने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत आणि जालंधरच्या SP (Detective) कडे ही जबाबदारी सोपवण्यात आलीय.
प्रत्यर्पण आणि भवितव्य : अमेरिकन एजन्सी आता या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या प्रत्यर्पणाची (Extradition) तयारी करत आहे. होशियारपूरचे SSP मात्र सावध आहेत; त्यांनी स्पष्ट केले की, सध्याची कारवाई केवळ सोशल मीडियावरील वृत्तांच्या आधारावर आहे. भारत सरकारकडून अधिकृत कागदपत्रे आल्यावरच यावर कायदेशीर कारवाईची पुढील दिशा स्पष्ट होईल.
थोडक्यात सांगायचे तर… हे प्रकरण केवळ एका पोलीस अधिकाऱ्याच्या निलंबनापुरते मर्यादित नाही. जर हे आरोप सिद्ध झाले, तर पंजाब पोलीस दलाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहील. एकीकडे गँगस्टरवाद आणि दुसरीकडे पोलीस-गँगस्टर युतीचा हा ‘खतरनाक गेम’ आता आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंत पोहोचलाय. आता प्रश्न हाच आहे की, कायद्याची चादर पांघरून गुन्हेगारी करणाऱ्या या ‘खाकी’चे काय होणार?
