Download App

रोजगारात भारताचा डंका, अमेरिकेनंतर दुसरा; कौशल्य विकासाचीही गरज, काय सांगतोय अहवाल?

क्यूएस फ्यूचर इंडेक्समध्ये भारताला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ग्रीन स्किल्ससह भविष्यातील रोजगाराच्या बाबतीत दुसरा क्रमांक मिळाला.

India Future Job Market : क्यूएस फ्यूचर इंडेक्स 2025 मध्ये (QS Skills Index) भारताला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि ग्रीन स्किल्ससह भविष्यातील रोजगार सज्जतेच्या बाबतीत दुसरा क्रमांक मिळाला आहे. परंतु, आर्थिक बदलांच्या बाबतीत भारत थेट 40 व्या क्रमांकावर आहे. तसेच भविष्यातील रोजगारांसाठी इच्छित कौशल्ये असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्देशांकात 37 व्या क्रमांकावर आहे. म्हणजेच, भारतात रोजगार उत्पन्न करण्याची क्षमता भविष्यातही राहणार आहे. परंतु, यासाठी आवश्यक आर्थिक बदल, कर्मचाऱ्यांतील कौशल्ये, वातावरण या महत्वाच्या घटकांवर भारताला मोठं काम करावं लागणार आहे.

क्यूएस वर्ल्ड फ्यूचर स्किल्स इंडेक्स आंतरराष्ट्रीय रोजगार मार्केटच्या विकसित होत असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी देश किती सज्ज आहे याचे मूल्यांकन करण्यासाठी विशिष्ट संकेतांचा वापर केला जातो. क्यूएस हे जागतिक उच्च शिक्षण क्षेत्रासाठी जगातील आघाडीचे डेटा विश्लेषण आणि उपायांपैकी एक संस्था आहे. एकूणच भारत सर्व निर्देशांकात भारत 25 व्या क्रमांकावर आहे.

यामध्ये कौशल्य आणि आस्थापनांच्या गरजा, शैक्षणिक तयारी आणि आर्थिक परिवर्तन यांचा समावेश आहे. या क्रमवारीमुळे भारताकडे भविष्यातील कौशल्यांचा दावेदार म्हणून पाहिले जात आहे. अमेरिका, ब्रिटेन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांसह दहा आघाडीच्या देशांना भविष्यातील कौशल्य प्रवर्तक म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही भारताच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे.

रोजगार गॅरंटी अन् स्किल डेव्हलपमेंट.. अर्थव्यवस्थेला बूस्ट देणारे डॉक्टर ‘मनमोहन’

या सर्वेक्षणात चार महत्वाचे घटक विचारात घेण्यात आले. यामध्ये स्किल्स फिट, रोजगाराचे भवितव्य, शैक्षणिक तयारी आणि आर्थिक परिवर्तन या घटकांचा विचार करण्यात आला. या घटकांवर भारताची कामगिरी कशी आहे हे देखील तपासण्यात आले. फ्यूचर ऑफ वर्क इंडिकेटरमध्ये भारत आज फक्त अमेरिकेच्या मागे आहे. भारताने जर्मनी आणि कॅनडा या देशांना मागे टाकलं आहे. हा निर्देशांक डिजिटल एआय आणि ग्रीन स्किल्सची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी जॉब मार्केट किती तयार आहे याचे मोजमाप करतो.

स्किल्स फिटच्या बाबतीत भारताने 59.1 अंक मिळवले आहेत. यामध्ये थोडं काळजी करण्यासारखं वातावरण आहे. अहवालात भारताला आर्थिक क्षमतेवर 100 गुण दिले असले तरी भविष्याभिमुख नाविन्यपूर्ण शाश्वततेच्या निकषावर ही स्थिती चांगली नाही. नवकल्पना आणि टिकाऊपणा याबाबती भारताला 100 पैकी फक्त 15.6 गुण मिळाले आहेत. या तुलनेत जी 7 देशांना 68.3, युरोपियन देशांना 59, आशिया पॅसिफिक देशांना 44.7 तर आफ्रिकन देशांना 25.4 गुण मिळाले आहेत.

आर्थिक बदलांमध्ये (Economic Transformation) भारताला 58.3 गुण मिळाले आहेत. या यादीत भारत 40 व्या क्रमांकावर आहे. भारताचे आर्थिक परिवर्तन विकास, कार्यबल कार्यक्षमता आणि उच्च शिक्षणाच्या विकसित भूमिकेमुळे चालत आले आहे. गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण क्षमतेतील तफावत यांमुळे दीर्घकालीन वाढ कमी होऊ शकते. आपली क्षमता पूर्णतः साकार करण्यासाठी भारताने मजबूत उच्च शिक्षण सुधारणा आणि कौशल्य विकासासह आर्थिक गती अबाधित राखली पाहिजे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

शैक्षणिक तयारीच्या बाबतीत भारताचा स्कोअर 89.9 इतका राहिला आहे. या निकषात भारत जगात 26 व्या क्रमांकावर आहे. भारताची पदवीधर लोकसंख्या आवश्यक कौशल्यांत बदल घडवून आणण्यासाठी काम करत आहे असे या अहवालात म्हटले आहे.

देशातलं पहिलं ‘AI School’ केरळात; तंत्रज्ञान कसे देणार धडे?

follow us