सर्व बाजूंनी चाल करुन येतोय! विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत राहुल गांधींचा मोदी सरकारला थेट इशारा

दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे.

News Photo   2026 10 10T185143.572

Rahul Gandhi CJP Protest

Rahul Gandhi CJP Protest : दिल्लीतील जंतर-मंतरवर सीजेपीकडून (CJP) आंदोलनाची हाक देण्यात आली असताना, पोलिसांनी आंदोलकांविरोधात कारवाई सुरू केली आहे. सीजेपीचे प्रमुख नेते अभिजीत दीपके यांना त्यांच्या सहकाऱ्यांसह ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर दिल्ली पोलिसांनीही अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. या कारवाईवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आंदोलन करणार्‍या तरुणांना पाठिंबा दिला असून, त्यांच्या लढ्याचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी या व्हिडिओतून केंद्र सरकारमधील प्रमुख नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत आणि अजित डोवाल यांच्यासह ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करत त्यांनी या सर्वांना देशातील सध्याच्या परिस्थितीसाठी जबाबदार धरलं आहे. देशाचं संविधान आणि लोकशाही यांच्यावर हल्ले होत असल्याचा आरोप करत, नागरिकांच्या हक्कांसाठी आपला लढा सुरूच राहील, अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली. कितीही लोकांना अटक केली तरी आंदोलन थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

गेल्या दशकाहून अधिक काळ आपण नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या विरोधात लढत असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं. विरोधकांची कार्यपद्धती आणि त्यांची रणनीती यांचा आपण सखोल अभ्यास केला असून, त्यांच्या प्रत्येक खेळीची आपल्याला माहिती असल्याचा दावा त्यांनी केला. या नेत्यांचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते भ्याडपणे वागतात, अशी टीका करत राहुल गांधी यांनी सत्ताधार्‍यांना थेट आव्हान दिलं आहे. सध्याच्या संघर्षात विरोधकांची कोंडी होत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

अभिजीत दिपकेला पोलिसांनी कुठे नेलं? आंदोलनाची धुरा मिळताच अजिंक्य शिंदेनं केला खुलासा!

आंदोलकांना रोखण्यासाठी सरकारने कितीही पोलीस बळाचा वापर केला तरी त्याचा परिणाम होणार नाही, असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. १० हजार, २० हजार किंवा ५० हजार पोलीस तैनात करा, सर्व नेत्यांना आणि तरुणांना अटक करा, पण आम्ही मागे हटणार नाही, असा आक्रमक संदेश त्यांनी दिला. सरकारने दडपशाहीचा मार्ग स्वीकारला तरी संविधानाच्या रक्षणासाठी लढणारे लोक आपली भूमिका सोडणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं. या लढ्यात सहभागी असलेल्या तरुणांनी घाबरुन जाण्याची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलं.

देशातील नागरिकांचा आवाज दाबण्याचे प्रयत्न सहन केले जाणार नाहीत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. संविधानाचं संरक्षण करणं आणि नागरिकांच्या हक्कांसाठी उभं राहणं ही आपली जबाबदारी असल्याचं सांगत, सरकारच्या कारवायांना सर्व बाजूंनी प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा त्यांनी दिला. गेल्या १० ते १५ वर्षांत देशात निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. या संघर्षात आवश्यक असलेली माहिती आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला.

आंदोलन करणार्‍या तरुणांचं कौतुक करत राहुल गांधी यांनी त्यांना लढा सुरू ठेवण्याचं आवाहन केलं आहे. देशातील युवकांच्या धैर्याचा आपल्याला अभिमान असून, त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचं त्यांनी सांगितलं. संविधानावर हल्ला करणार्‍यांचा आणि लोकशाहीला कमकुवत करणार्‍या सरकारचा पराभव करण्यासाठी एकत्रितपणे लढा दिला जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. पोलिसांच्या कारवाईनंतर राहुल गांधी यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे सीजेपीच्या आंदोलनाला राजकीय पाठिंबा मिळाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

Exit mobile version