Download App

लेट्सअप विशेष : राहुल गांधींना राजकारण कळतं?

  • Written By: Last Updated:

योगेश कुटे
संपादक लेट्सअप मराठी 

काॅंग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांनी पक्षाचे नेतृत्व हाती घेतल्यापासून तो पक्ष नीचांकी कामगिरी करत आहे. तरीही अनेकांना अजूनही तेच मोदींना टक्कर देऊ शकतात, असे वाटते आहे. भाजपला देशभर पर्याय देणारा काॅंग्रेस हाच एकमेव पक्ष असल्याने राहुल यांच्याशिवाय सध्या तरी पर्याय नाही. `भारत जोडो यात्रे`नंतर राहुल बदलले आहेत, असे अनेकांचे म्हणणे आहे. पण सामान्यांना जे कळते ते त्यांना कळू नये, असे सध्या दिसून येत आहे.

राहुल यांच्याविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करणे, अशा तुलनेने किरकोळ गुन्ह्यासाठी त्यांना बरोबर दोन वर्षांचीच शिक्षा देणे, त्यांची खासदारकी घालवणे आणि आता घरही खाली करायला लावणे यामुळे काॅंग्रेसजनांना आनंद व्हायला हवा. कारण मोदी-शहांच्या विरोधात लढण्यासाठी योग्य ते वातावरण तयार करण्याची संधी काॅंग्रेसला मिळाली आहे. काॅंग्रेस हा मोठा विरोधी पक्ष असल्याने त्यांच्यावर ती पण जबाबदारी आहे. अशी संधी समोर असताना राहुल मात्र आपलं `सावरकरांच्या माफीचं` तुणतुणं वाजवित बसले आहेत. गांधी हूॅं, सावरकर नहीं, अशी विनाकारण विवादास्पट टिप्पणी करून राहुल यांनी नक्की काय साधले?

भाजपच्या विरोधात जाण्यासाठी शिवसेनेसारखा कट्टर उजवा पक्षही काॅंग्रेससोबत आहे. विरोधकांची एकजूट करण्यासाठी काही वादग्रस्त मुद्दे काॅंग्रेसने बाजूला ठेवायला हवेत. पण राहुल नेमके तेच करत नाहीत. दर काही दिवसांनी सावरकरांच्या माफीचा मुद्दा उपस्थित करून आपल्याच पायावर धोंडा पाडून घेत आहेत.

तीन महिन्यात काबूल दोनदा हादरले; बॉम्ब स्फोटात 6 जणांचा मृत्यू तर 12 जखमी

सावरकरांनी माफी मागितली त्याची `शिक्षा` त्यांना तेव्हाच भारतीय मतदारांनी दिली आहे. त्यांचा हिंदू महासभा हा पक्ष फार प्रभावी बनू शकला नाही. सावरकर हयात होते तोपर्यंत राष्ट्र्रीय स्वयंसेवक संघानेही त्यांना जवळ केलेले नव्हते. सावरकर यांच्या द्विराष्ट्र सिद्धांताच्या विचारांमुळे फाळणी झाली म्हणजे जणू काही मोहम्मद अली जिनांनी अखंड भारतासाठीच आपले प्राण वेचले होते, असेच म्हणण्यासारखे आहे. फाळणीचे खरे खलपुरूष त्या जिनांचे नावही फाळणीसंदर्भातही राहुल घेत नाहीत. खरे तर फाळणीची जबाबदारी तत्कालीन काॅंग्रेस नेत्यांवर जास्त येते. त्यात राहुल यांचे पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू यांचाही समावेश होते.

सावरकर यांच्यावर टीका केल्याने मुस्लीम मते आपल्याला मिळतील, अशी भाबडी आशा राहुल यांना वाटत असावी. पण मुस्लिमांचीही मते काॅंग्रेसला मिळत नसल्याचे दिसून येत आहे. उलट सावरकरांवर टीका केल्याने काॅंग्रेस हा हिंदूविरोधी पक्ष असल्याची भावना हिंदूंमध्ये तयार होते आहे. हे राहुल गांधींना कळत नसावे का? इतिहासातील एखाद्या नेत्याचे तत्कालीन वागणे हा वर्तमानाचा कसा काय प्रमुख मुद्दा होऊ शकते? त्याच्यावर फारतर अभ्यासकांनी पुस्तकांतून वाद घालावा. तो निवडणुकीचा मुद्दा म्हणून पुढे रेटण्यात हशील नाही.

‘उमेश पाल अपहरण’ प्रकरणात अतिक अहमदला दोषी ठरवणारे न्यायाधीश कोण?

जनतेची नाडी कळालेला जो खरा लोकनेता आहे, तो कोणत्याही ऐतिहासिक नेत्यावर टीका करणार नाही. सावरकरांवर टीका करून काॅंग्रेसला जादा मते मिळणार नाहीत. भाजपच्या एककल्ली कारभारामुळे नाराज असलेल्या मंडळींनाही सावरकर माफीचा मुद्दा अनाठायी असल्याचे वाटत आहे. ही मंडळी आता काठावर आहेत. २०२४ पर्यंत त्यांना काॅंग्रेसकडे वळविणे ही मोठी जबाबदारी आहे. राहुल यांच्या आसपास कोणी लोकनेता वावरत नाही. त्यामुळे जनतेची नाडी त्यांना कळत नसावी. त्यांचे निकटवर्तीय म्हणून अभ्यासक, डाव्या चळवळींप्रती सहानूभूती बाळगणारे विचारवंत आहेत. त्यांनी हे सावरकर माफीचे खूळ राहुल यांच्या डोक्यात भिनवले आहे. हे खूळ लवकरात लवकर निघण्याची गरज आहे. तरच काॅंग्रेस ही विरोधकांची मोट बांधू शकेल. अन्यथा काॅंग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा शंभरच्या आत गुंडाळली गेली तर आश्चर्य वाटायला नको.

शिवसेनेशिवाय कोणी मित्र नव्हता तेव्हा राममंदिर, ३७० वे कलम असे वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवून भाजपने आपल्या मित्रपक्षांची संख्या वाढवली. त्यातून हा पक्ष १९९८ मध्ये प्रथम सत्तेवर आला. २०१४ मध्ये स्वबळावर सत्तेवर आल्यानंतर मित्रपक्षांना धडा शिकवलाच पण भाजपने काॅंग्रेसला अनेक राज्यांतून गाशा गुंडाळायला लावला. बहुमत आल्यावरच आपला अजेंडा पूर्ण केला. आपण कमजोर आहोत, तेव्हा आपला मूळ अजेंडा दूर ठेवण्याचा शहाणपणा राहुल यांनी भाजपकडून शिकावा. त्यात `सावरकर माफी` हा तर अजेंडापण नाही. इतर भरपूर मु्द्दे भाजप विरोधात लढण्यासाठी आहेत. पण राहुल यांना हा सल्ला कोण देणार?

Tags

follow us