लोकसभेत राहुल गांधींचा गंभीर आरोप; शिक्षण मंत्रालय नाही, RSS चालवतंय देशाची शिक्षण व्यवस्था

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तीव्र टीका केली.

Untitled Design   2026 07 29T155548.699

Untitled Design 2026 07 29T155548.699

Rahul Gandhi’s serious allegation : देशातील सार्वजनिक परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आणण्यात आलेल्या सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक 2026 वर लोकसभेत चर्चा सुरू असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तीव्र टीका केली. त्यांच्या भाषणादरम्यान करण्यात आलेल्या आरोपांमुळे लोकसभेत मोठा गदारोळ झाला आणि अखेर सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले.

राहुल गांधी यांनी शिक्षण व्यवस्थेतील हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर निशाणा साधला. धर्मेंद्र प्रधान यांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवले नाही. शिक्षण व्यवस्थेवर प्रत्यक्ष नियंत्रण आरएसएसचे आहे. देशातील विद्यापीठांमध्ये नियुक्त होणारे कुलगुरू आरएसएस विचारसरणीशी संबंधित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा संघर्ष धर्मेंद्र प्रधान यांच्याशी नसून आरएसएसच्या विचारसरणीशी आहे, असा आरोप त्यांनी केला.

यावेळी राहुल गांधी यांनी आरएसएसवर आणखी टीका करत फक्त शैक्षणिक संस्थाच नव्हे, तर संपूर्ण व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेण्याचा प्रयत्न आरएसएसने केला आहे, असं विधान त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर पक्षाच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि सभागृहात घोषणाबाजी सुरू झाली. विद्यार्थी आंदोलनाचा संदर्भ देताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे पालक देखील सरकारविरोधात बोलण्यास घाबरत आहेत. मात्र, या तरुणांनी अन्यायाविरोधात उभे राहण्याचं धाडस दाखवलं. याचवेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप करत विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या पोलिसी कारवाईचा मुद्दा उपस्थित केला.

गृहमंत्र्यांच्या आदेशाने विद्यार्थ्यांवर गोळीबार; लोकसभेत राहुल गांधींच्या गंभीर आरोप, भाजपकडून जोरदार आक्षेप, कामकाज तहकूब

देशाचे गृहमंत्री संसदेत उपस्थित राहण्याचे धाडस दाखवत नाहीत. विद्यार्थ्यांवर पॅलेट गन वापरण्याचे आदेश कुणी दिले, याचे उत्तर सरकारने द्यावे, असे म्हणत राहुल गांधी यांनी अमित शाह यांच्यावर थेट निशाणा साधला. त्यांच्या या विधानांनंतर सत्ताधारी सदस्यांनी जोरदार विरोध दर्शवला आणि सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला. राहुल गांधी यांच्या आरोपांवर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी तातडीने आक्षेप घेतला. अशा गंभीर आरोपांची ठोस पुरावे सादर करावेत. कोणत्याही आधाराशिवाय गृहमंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही, असे ते म्हणाले. तसेच राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे किंवा माफी मागावी अशी मागणी देखील त्यांनी केली.

राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादाचा उल्लेख करताना ‘इडियट’ हा शब्द वापरला. तसेच ‘अंधभक्त’ या शब्दाचा संदर्भ देत त्यांनी काही उदाहरणे मांडली. या दोन्ही शब्दांवरून सत्ताधारी सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि सभागृहात पुन्हा गदारोळ सुरू झाला. गोंधळ वाढत असताना राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त करत, जर माझे म्हणणे ऐकून घेण्याची तयारी नसेल आणि केवळ सत्ताधारी सदस्यांनाच बोलण्याचा अधिकार असेल, तर मी शांत बसतो, असे म्हटले. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हस्तक्षेप करत सभागृहातील सदस्यांना राहुल गांधी यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आवाहन केले.

मात्र, आरोप-प्रत्यारोप आणि घोषणाबाजीमुळे वातावरण अधिकच तापले. अखेर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात शिस्त राखण्याचे आवाहन केले. तरीही गदारोळ थांबत नसल्याने लोकसभेचे कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. राहुल गांधी यांच्या भाषणामुळे परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चा काही काळ बाजूला पडली आणि संसदेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला.

Exit mobile version