पुढील काही तासांत केरळमध्ये मान्सूनचे आगमन, महाराष्ट्रात पावसाचा इशारा, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

Untitled Design 29

Untitled Design 29

Rain warning in Maharashtra : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच हवामान विभागाकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे. नैऋत्य मान्सूनच्या प्रगतीला वेग आला असून पुढील काही तासांत तो केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. काही भागांत वाऱ्यांचा वेगही वाढू शकतो.

मध्य महाराष्ट्रातही हवामानात बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिकच्या घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी वादळी वारे वाहू शकतात. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः घाटमाथा परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बिहार हादरलं! मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये लागलेल्या भीषण आगीत 10 जणांचा मृत्यू; खिडक्या फोडून रुग्णांची सुटका

दरम्यान, विदर्भातील अनेक भागांत उष्णतेची लाट कायम आहे. काल काही ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवण्यात आले. मात्र, वर्धा जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यातील उर्वरित भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे, नैऋत्य मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू असून त्याने लक्षद्वीप बेटे, अरबी समुद्राचा काही भाग, कोमोरिन क्षेत्र तसेच बंगालच्या उपसागरातील काही भाग व्यापले आहेत.

सध्या केरळ, तमिळनाडूच्या काही भागांसह अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील अनेक क्षेत्रांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काही तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मान्सूनच्या आगमनाच्या या सकारात्मक घडामोडींमुळे राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या असून, आता सर्वांचे लक्ष मान्सूनच्या अधिकृत आगमनाकडे लागले आहे.

Exit mobile version