Download App

वाद चिघळला! गेहलोतांना घेरण्यासाठी पायलट काढणार जनसंघर्ष यात्रा, प्लॅनिंग काय ?

Ashok Gehlot vs Sachin Pilot : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. मागील महिन्यात आपल्याच सरकारविरोधात आंदोलन केल्यानंतर आता पायलट 11 मेपासून संघर्षयात्रा काढणार आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली.

मुख्यमंत्री गेहलोत यांनी पायलटांवर आरोप केले होते. त्यावर पायलट माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत. माझी बदनामी करण्याचे प्रयत्न काही लोक करत आहेत. मी आता पूर्ण निराश झालो असून संघर्ष यात्रा काढणार आहे. अजमेरपासून पदयात्रा सुरू करणार आहे. लोकांशी संवाद साधणार आहे.

ते पुढे म्हणाले, गेहलोतांचे धौलपूर येथील भाषण ऐकले. ते ऐकल्यानंतर असे वाटत होते की त्यांच्या नेत्या सोनिया गांधी नाही तर वसुंधरा राजे आहेत. एकीकडे म्हणायचे की सरकार पाडण्याचे काम भाजप करत आहे आणि दुसरीकडे म्हणायचे की सरकार वाचविण्याचे काम भाजप करत होता. त्यामुळे तुम्हाला नेमके काय म्हणायचे हे स्पष्ट करा, असे आव्हान पायलट यांनी दिले.

मला बरेच काही म्हटले गेले कधी कोरोना तर कधी गद्दार. अडीच वर्षांपासून मी हे ऐकत आहे. तरी देखील आम्ही शांत होतो कारण आम्हाला पक्षाचे नुकसान करायचे नव्हते. मात्र आपल्याच आमदार, नेत्यांची बदनामी करायची आणि भाजपाचे गुणगान करायचे हे समजण्यापलीकडचे आहे. जे मागील 40 ते 45 वर्षांपासून राजकारणात आहेत अशा आमदारांवर आरोप केले जात आहेत. हे चुकीचे आहे, असे पायलट म्हणाले.

40 टक्क्यांवरुन शरद पवारांनी हाणला डाव, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अखेर बोललेच

पायलट म्हणाले, आता 11 मे पासून अजमेर येथून जनसंघर्ष यात्रा काढणार आहोत. ही यात्रा 125 किलोमीटरचे अंतर पार करून जयपूरला पोहोचेल. या पाच दिवसांच्या यात्रेत लोकांशी संवाद साधून त्यांच्यासमक्ष आपले म्हणणे मांडणार आहे.

ते पुढे म्हणाले, मी ज्यावेळी 2020 मध्ये राज्याचा उपमुख्यमंत्री होतो तेव्हा राजद्रोहाच्या आरोपांखाली माझ्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक गटाला परिवर्तन पाहिजे होते. अशा परिस्थितीत आम्ही दिल्लीतील नेतृत्वासमोर आमचे म्हणणे मांडले. यानंतर समिती नियुक्त करण्यात आली होती. यानंतर समितीने सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेत एक रोड मॅप तयार केला. या दरम्यान अनुशासन हिनतेचे काम कुणीही केले नाही. तरी देखील माझ्यावर वारंवार आरोप केले जात होते. यामुळे मी आता निराश झालो आहे. शेवटी यात्रेच्या माध्यमातून संघर्ष करण्याचा निर्णय घेतला.

Tags

follow us